Republic Day Parade Representational Image (Photo Credits: PTI)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली 26  जानेवारी 2022 रोजी देश 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) साजरा करणार आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा  हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष  देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात असल्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने, 26 जानेवारी रोजी राजपथावरील मुख्य संचलन आणि 29 जानेवारी रोजी विजय चौक येथे होणाऱ्या ‘बीटिंग द रिट्रीट’ समारंभाच्या वेळी संरक्षण मंत्रालयाने नवीन कार्यक्रमांच्या मालिकेची संकल्पना मांडली आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आता दरवर्षी 23 ते 30 जानेवारी या कालावधीत आठवडाभर चालेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 23 जानेवारी रोजी असणाऱ्या जयंतीपासून या सोहळ्याची  सुरुवात होईल आणि हुतात्मा दिन असलेल्या 30 जानेवारी रोजी या सोहळ्याची सांगता होईल.

अनेक अनोखे उपक्रम- 

मुख्य संचलना दरम्यान अनेक उपक्रम पहिल्यांदाच आयोजित केले असून यात  राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्र सैनिकांद्वारे ‘शहीदों को शत शत नमन’ कार्यक्रमाचा आरंभ, भारतीय हवाई दलाच्या 75 विमाने/हेलिकॉप्टर्सचे  भव्य हवाई प्रदर्शन, देशव्यापी वंदे भारतम नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेल्या 480 नर्तकांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ‘कला कुंभ’ कार्यक्रमादरम्यान दृश्य कला पद्धतीचा वापर करून स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित नायकांच्या नावांची यादी असलेल्या प्रत्येकी 75 मीटर लांबीच्या  दहा लेखपटांचे  प्रदर्शन, हा सोहळा प्रेक्षकांना चांगल्या रितीने अनुभवता यावा यासाठी 10 मोठ्या एलईडी स्क्रीन 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यासाठी, प्रोजेक्शन मॅपिंगसह स्वदेशी बनावटीच्या 1,000 ड्रोनद्वारे ड्रोन शो यांसारख्या अनोख्या कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

संचलनाच्या वेळेत बदल

संचलन आणि हवाई प्रदर्शनासाठी अधिक चांगली दृश्यमानता असावी यादृष्टीने, राजपथावरील संचलन पूर्वीच्या सकाळी 10 वाजताच्या वेळे ऐवजी सकाळी  10. 30 वाजता सुरू होईल.

डिजिटल नोंदणी

सध्याची कोविड-19 परिस्थिती लक्षात घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जनतेला  हा सोहळा ऑनलाइन पाहता यावा  MyGov (https://www.mygov.in/rd2022/) पोर्टलवर  नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

कोविड प्रतिबंधासाठी सुरक्षा उपाय

संचलनामध्ये केवळ कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रौढ/लसीची एक मात्रा घेतलेल्या 15 वर्षे आणि  त्यावरील मुलांना प्रवेश दिला जाईल. सर्व सामाजिक अंतराचे नियम पाळले जातील आणि मास्क घालणे अनिवार्य आहे. या वर्षी महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही परदेशी तुकडी संचलनात सहभागी होणार नाही.

खास प्रेक्षक

समाजातील ज्या घटकांना सहसा संचलन पाहायला  मिळत नाही त्यांना संधी देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ऑटो-रिक्षा चालक, बांधकाम कामगार, सफाई कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन तसेच ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

संचलन

प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन होईल. देशाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण  करून शहीद वीरांना ते आदरांजली वाहतील. त्यानंतर, पंतप्रधान आणि इतर मान्यवर संचलन पाहण्यासाठी  राजपथवरील  मानवंदना मंचाकडे जातील.

परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि त्यानंतर 21 तोफांची जोरदार सलामी देऊन राष्ट्रगीत होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मानवंदना स्वीकारल्यानंतर संचलनाला सुरुवात होईल. .

सर्वोच्च शौर्य पुरस्कार विजेते संचलनात सहभागी होतील. यात परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेत्यांचा समावेश आहे. सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंह यादव, 18 ग्रेनेडियर्स (निवृत्त) आणि सुभेदार (मानद लेफ्टनंट) संजय कुमार, 13 जेएके रायफल्स हे  परमवीर चक्र विजेते आणि   अशोक चक्र विजेते कर्नल डी श्रीराम कुमार जीपवर उप संचलन  कमांडर म्हणून नेतृत्व करतील.

भारतीय सैन्य दल

संचलनात पहिली तुकडी पूर्वीच्या ग्वाल्हेर लान्सर्सच्या गणवेशातील मेजर मृत्युंजय सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील 61 घोडदळ असेल. 61 घोडदळाच्या माऊंटेड कॉलमद्वारे भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व केले जाईल. लष्कराच्या एकूण सहा संचालन  तुकड्या या संचलनात सहभागी होतील यात राजपूत रेजिमेंट, आसाम रेजिमेंट, जम्मू आणि काश्मीर लाइट रेजिमेंट, शीख लाइट रेजिमेंट, आर्मी ऑर्डनन्स कोअर  आणि पॅराशूट रेजिमेंट यांचा समावेश आहे. लष्कराच्या कवायती संचलनात पाहता येणार आहेत.

भूतकाळ ते वर्तमान: सैनिकांचा गणवेश आणि शस्त्रे यांच्या  विविध टप्प्यावरील बदलाचे दर्शन 

गेल्या 75 वर्षांतील भारतीय लष्कराच्या गणवेश आणि जवानांच्या  शस्त्रास्त्रांच्या विकासाच्या विविध टप्प्यावरील  प्रदर्शन ही संचलन तुकड्यांची  संकल्पना असेल. संचलनात सहभागी लष्कराच्या सहा तुकड्या लष्कराचे आतापर्यंतचे गणवेश परिधान करून संचलन करतील.

भारतीय नौदलाची तुकडी

नौदलाच्या तुकडीमध्ये 96 तरुण नौसैनिक आणि चार अधिकाऱ्यांचा समावेश असेल तुकडीच्या कमांडर म्हणून लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा नेतृत्व करतील. त्यानंतर भारतीय नौदलाच्या बहुआयामी क्षमतांचे प्रदर्शन आणि 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत प्रमुख उपक्रमांना अधोरेखित करणारा नौदलाचा चित्ररथ सादर केला जाईल.

भारतीय हवाई दलाची तुकडी

भारतीय हवाईदलाच्या तुकडीमध्ये 96 हवाई सैनिक आणि चार अधिकारी असून या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर प्रशांत स्वामीनाथन करतील. 'भारतीय हवाईदल, भविष्यासाठी परिवर्तन' या शीर्षकाखाली भारतीय हवाई दलाचा चित्ररथ सादर होणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा चित्ररथ

देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगती दर्शविणारे दोन चित्ररथ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ )सादर करणार आहे.

भारतीय तटरक्षक दल तुकडी

भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) तुकडीचे नेतृत्व डेप्युटी कमांडंट एच. टी मंजुनाथ करतील.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि दिल्ली पोलिसांची तुकडी

सहाय्यक कमांडंट अजय मलिक यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) ची तुकडी संचलात सहभागी होईल. सर्वोत्कृष्ट संचलनाची 15 वेळा विजेती असलेल्या दिल्ली पोलिसांच्या तुकडीचे नेतृत्व  सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक भगत करणार आहेत.

एनसीसी तुकडी

नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी) च्या मुलांच्या तुकडीचे नेतृत्व पंजाब संचालनालयाचे वरिष्ठ अंडर ऑफिसर रूपेंद्र सिंह चौहान करतील तर कर्नाटक संचालनालयाच्या वरिष्ठ अंडर ऑफिसर प्रमिला या एनसीसी मुलींच्या तुकडीचे नेतृत्व करतील.

चित्ररथ

यानंतर 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात आलेल्या 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि नऊ मंत्रालये/विभागांच्या  चित्ररथाचे सादरीकरण केले जाईल. यात 'महाराष्ट्राची जैवविविधता आणि राज्य जैव-मानके' या विषयावरील चित्ररथाचा समावेश आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथाची  यादी खालीलप्रमाणे आहे:

S No State/UT Theme
1 Arunachal Pradesh Anglo-Abor (Adi) Wars
2 Haryana Haryana: No 1 in Sports
3 Chhattisgarh Godhan Nyay Yojana: A new path to prosperity
4 Goa Symbols of Goan heritage
5 Gujarat Tribal Revolutionaries of Gujarat
6 Jammu & Kashmir Changing face of Jammu & Kashmir
7 Karnataka Karnataka: The cradle of traditional handicrafts
8 Maharashtra Biodiversity and State Bio-symbols of Maharashtra
9 Meghalaya Meghalaya’s 50 years of Statehood and its tribute to Women-led cooperative societies and SHGs
10 Punjab Punjab’s contribution in freedom struggle
11 Uttar Pradesh ODOP and Kashi Vishwanath Dham
12 Uttarakhand Pragati Ki Aur Badhta Uttarakhand

मंत्रालये/विभागांच्या चित्ररथांची  यादी खालीलप्रमाणे आहे:

S No Ministry/Department Theme
1 Ministry of Education & Ministry of Skill Development & Entrepreneurship National Education Policy
2 Ministry of Civil Aviation UDAN - Ude Desh Ka Aam Nagrik
3 Ministry of Communication/Department of Posts India Post: 75 years @ Resolve - Women Empowerment
4 Ministry of Home Affairs (CRPF) CRPF: Saga of Valour and Sacrifice
5 Ministry of Housing & Urban Affairs (CPWD) Subhash @125
6 Ministry of Textiles Shuttling to the Future
7 Ministry of Law & Justice, Department of Justice Ek Mutthi Aasmaa: Lok Adalat, Inclusive Legal system
8 Ministry of Jal Shakti, Department of Drinking Water & Sanitation Jal Jeevan Mission: Changing Lives
9 Ministry of Culture 150 years of Shri Aurobindo

चित्रररथांच्या सादरीकरणानंतर, 'वंदे भारतम' या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेल्या 480 नर्तकांचा  सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. यानंतर बीएसएफच्या सीमा भवानी मोटरसायकल पथक आणि इंडो-तिबेटियन सीमा  पोलिस (आयटीबीपी) च्या हिमवीर यांच्याकडून दुचाकीवरील  कवायती .सादर केल्या जातील.

हवाई प्रदर्शन

संचलनाचा भव्य समारोप आणि आतुरतेने ज्याची वाट पाहिली जाते तो संचलनाचा भाग म्हणजे हवाई प्रदर्शन, पहिल्यांदाच भारतीय दलाची 75 विमाने/हेलिकॉप्टर ‘स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून अनेक प्रकारे हवाई  प्रदर्शन करणार आहेत. राष्ट्रगीत आणि तिरंगी फुगे आकाशात  सोडून समारंभाची सांगता होईल. प्रथमच भारतीय हवाई दलाने हवाई प्रदर्शनादरम्यान  कॉकपिटमधून दिसणारी दृश्ये  दाखवण्यासाठी दूरदर्शनशी समन्वय साधला आहे.