उद्या देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये काही खास कार्यक्रम होणार आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेड 2022 मध्ये 17 लष्करी तुकड्या, 16 मार्चिंग तुकड्या आणि विविध राज्ये, विभाग आणि सशस्त्र दलांचे 21 चित्ररथ सामील होणार आहेत. 22 जानेवारी 2022 रोजी भारतीय लष्कराने एका निवेदनात याबाबतचा तपशील जाहीर केला होता. उल्लेखनीय म्हणजे, प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ज्या राज्यांचे चित्ररथ निवडले आहेत अशा राज्यांपैकी, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाब या ठिकाणी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन परमवीर चक्र आणि एक अशोक चक्र पुरस्कार विजेते देखील यंदाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या प्रारंभापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्राचे नेतृत्व करतील. परेड-2022 ची सुरुवात सकाळी 10.30 वाजता विजय चौक ते राजपथ या पारंपारिक मार्गाने नॅशनल स्टेडियमपर्यंत होईल आणि दुपारी 12 वाजता विविध राज्ये, विभाग आणि सशस्त्र दलांच्या 21चित्ररथांसह समाप्त होईल.
भारतीय लष्कराने शनिवारी सांगितले की, प्रजासत्ताक दिन परेड-2022 मध्ये घोडदळ, 14 यांत्रिक स्तंभ, सहा मार्चिंग तुकडी आणि विमान वाहतूक शाखेच्या प्रगत हलक्या हेलिकॉप्टरद्वारे फ्लायपास्टद्वारे सैन्याचे प्रतिनिधित्व केले जाईल. भारतीय लष्कराच्या सहा मार्चिंग तुकड्या- राजपूत रेजिमेंट, आसाम रेजिमेंट, जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री, शीख लाइट इन्फंट्री, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स रेजिमेंट आणि पॅराशूट रेजिमेंट अशा असतील.
परेडमध्ये भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलातील प्रत्येकी एक मार्चिंग तुकडी देखील सहभागी होणार आहे. यावर्षी, हिवाळ्याच्या हंगामात लडाखमध्ये 13,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर राहणाऱ्या लोकांच्या घरां,अध्ये स्वच्छ नळाचे पाणी पोहचवले गेले, त्याबाबतचा चित्ररथ जल जीवन मिशन सादर करणार आहे. आयटीबीपीची एक पुरुष टीम आणि बीएसएफ (BSF) ची एक महिला टीम मोटरसायकलचे प्रदर्शन करेल. (हेही वाचा: Tableau of Maharashtra 2022: यंदाच्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ; जाणून घ्या काय असेल खास)
प्रजासत्ताक दिन 2022 च्या परेडमधील 12 चित्ररथ हे 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत आणि उर्वरित नऊ विविध मंत्रालयांचे असतील. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मेघालय, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे.