आपल्या अजरामर लेखणीने, विनोदी कौशल्याने महाराष्ट्र लाडकं व्यक्तिमत्व ठरलेले लेखक पु.ल.देशपांडे (Pu LA Deshpande) यांची आज 101 वी जयंती. त्यांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या साहित्याचा अमूल्य साठा महाराष्ट्राला लाभला आहे. त्यामुळे हा अमूल्य साठा सोप्या पद्धतीने घराघरात पोहोचावा यासाठी आजपासून पु.ल.देशपांडे यांची साहित्यसूची ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली आहे. अतिशय कठीण गोष्ट सोप्या आणि मिश्किलपणे लोकांसमोर मांडण्यात हातखंडा असलेल्या पु.ल. देशपांडे यांचे थोर विचार आजच्या आणि पुढील पिढीपर्यंत देखील पोहोचावे यासाठी डिजिल पद्धतीने लोकांसमोर आणण्यात आले आहे.
या संकेतस्थळावर पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची भाषणे, मुलाखती, त्यांचे अनेक व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेले पुस्तके, साहित्य, चित्रपट, नाटक या सर्वांविषयी या संकेतस्थळावर माहिती मिळेल. यासाठी येथे क्लिक करा.
याचबरोबर पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांचे अन्य भाषांमध्ये झालेले अनुवाद देखील येथे उपलब्ध होतील अशी माहिती पुलंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांनी दिली आहे. या संकेत स्थळावर पुलंची पुस्तके या विभागाने होते. यात तुम्हाला 1948 ते 2004 या कालावधीत पुलं आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या हयातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या 60 पुस्तकांचा आणि पुलंच्या निधनांनतर प्रकाशित झालेल्या सहा पुस्तकांचा समावेश आहे. त्याचबरोबर संकलीत साहित्य, पुलंवरील साहित्य आणि पुलंचे इतर भाषांत झालेले अनुवाद असे विभाग तुम्हाला दिसतील. त्यावर क्लिक करुन ती सविस्तर माहिती मिळवू शकता.
पु.ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुलं प्रेमींना याहून चांगली भेट काय असू शकते. मुळात त्यासाठी 101 व्या जयंतीचे निमित्त म्हणजे सुवर्णयोगच म्हणावा लागेल.