PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

आज, 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2021) साजरा होत आहे. सध्या या उत्सवावर असलेल्या कोरोना विषाणू सावटामुळे हा उत्सव जरी सार्वजनिकरित्या साजरा होत नसला, तरी तो आपल्यापरीने साजरा करण्याचा उत्साह कमी होताना दिसत नाही. केंद्र सरकारने योग दिन साजरा करण्याची जय्यत तयरी केली आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) योग दिनानिमित्ताने आज जनतेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, ते आज सकाळी साडेसहा वाजता 7 व्या योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करतील.

यावर्षीची थीम 'योग फॉर वेलनेस' असून ती शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग करण्यावर केंद्रित आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 चा मुख्य कार्यक्रम दूरचित्रवाणीवरून प्रसारित होईल. सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर सकाळी 6.30 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आयुष राज्यमंत्री किरेन रिजिजू यांचे भाषण आणि मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाद्वारे योग प्रात्यक्षिकेचे थेट प्रक्षेपणदेखील करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम तुम्ही डीडी न्यूजवर लाईव्ह पाहू शकता –

देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती सहभागी होणार आहेत. कोरोना प्रोटोकॉल लक्षात ठेवून, एका ठिकाणी फक्त 20 लोक कार्यक्रमास उपस्थित राहतील. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रह्लादसिंग पटेल हे लाल किल्ला परिसरात मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सकाळी 7 ते 7.45 दरम्यान योग करतील.

(हेही वाचा: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खास मराठी Messages, Greetings, HD Images, Wishes, Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा)

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने 75 ऐतिहासिक ठिकाणी योगा इन इंडियन हेरिटेज कार्यक्रम आयोजित केला आहे. या अंतर्गत, जागतिक वारसा साइट्स, स्मारके, सांस्कृतिक, ऐतिहासिक साइटसह देशभरातील 75 ठिकाणे सामील आहेत. या 75 पैकी 30 ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांचे मंत्रालयाच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण केले जाईल.