
बघता बघता 2020 वर्ष संपत आले. आज 31 डिसेंबर, या वर्षातील शेवटचा दिवस. जगभरात हा दिवस नववर्षाची पूर्वसंध्या (New Year's Eve) म्हणून साजरा केला जातो. सर्वसामान्यपणे नवीन वर्षाची संध्याकाळ खास पार्टी करून साजरी केले जाते. या संध्याकाळी नाच-गाणे, खाणे-पिणे, मित्रांना-आप्तेष्टांना भेटणे असा कार्यक्रम असतो. ही पार्टी सहसा 1 जानेवारी पाहतेपर्यंत चालले. अशा या नववर्षाच्या पूर्व संध्येला गुगलने खास डूडल (Google Doodle) बनवले आहे. 2020 हे वर्ष सर्वांसाठीच फार कठीण होते. कोरोना विषाणू महामारीच्या हाहाकाराचा संपूर्ण जगावर परिणाम झाला.
या वर्षात लोकांना फार नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेक नवीन गोष्टी अवलंबायला लागल्या. 2020 ने लोकांची जगण्याची पद्धतच बदलून टाकली. अनेक प्रतिष्ठित लोकांच्या मृत्युपासून ते आर्थिक विवंचना अशा अनेक गोष्टी 2020 ने दाखवल्या. त्यामुळे येणारे 2021 हे वर्ष लोकांना सुखाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी जावो अशीच प्रार्थना सर्वांच्या मनी आहे. 2021 कडून लोकांच्या फार सकारात्मक आशा आहेत. 2021 मध्ये कोरोनाची लस येण्याचीही अपेक्षा आहे, अशा परिस्थितीमध्ये येणारे नवीन वर्ष आपल्या पोतडीमध्ये कोणत्या गोष्टी घेऊन आले हे येणारा काळच सांगेल. (हेही वाचा: येणाऱ्या वर्षाच्या स्वागताला खास मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून द्या नववर्षाच्या शुभेच्छा)
मात्र आता 2021 चे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अनेकांनी काही खास योजना आखल्या असतील. मात्र कोरोनामुळे अनेक ठिकाणी बरेच निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांचे पालन करूनच नवीन वर्षाचे स्वागत करा. येणारे नवीन वर्ष अनेक संधी घेऊन येईल, त्या संधींचे सोने करा. स्वतःची काळजी घ्या व इतरांनाही काळजी घेण्यास भाग पाडा. या नवीन वर्षात अनेक लोक खूप काही संकल्प करतात, यामध्ये सकस आहार, व्यायाम आणि सुयोग्य जीवनशैली अवलंबण्याचाही संकल्प करा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.