श्रावण (Shravan 2019) आणि सण म्हणजे एकूणच विवाहितांच्या आवडीचं समीकरण म्हणायला हवं, त्यातही मंगळागौरीचे (Manglagaur) औचित्य म्हणजे दुग्धशर्करा योग. उद्या, यंदाच्या श्रावणातील दुसरी मंगळागौर आहे. यानिमित्ताने अनेक घरांमध्ये गौरीची पूजा आणि मग त्याला जोडून फुगड्या, पिंगा, अशा खेळांच्या निमित्ताने आजूबाजूच्या सर्व स्त्रिया एकत्र जमतील. खरंतर असं निमित्त म्हंटल की पहिला हट्ट होतो तो म्हणजे उखाण्यांचा, त्यातही एखादी नववधू घरात असली की हा हट्ट काही केल्या थांबत नाही.अशावेळी तुमची पंचाईत होऊ नये आणि तुम्हाला तेच तेच जुने उखाणे घ्यायला लागू नयेत म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय हे काही हटके भन्नाट उखाणे नक्की लक्षात ठेवा..
मंगळागौर खास उखाणे
- हंड्यावर हंडे सात
त्यावर ठेवली परात
परातीत होते सातू
सातूचा केला भात
भातावर वरण, वरणावर तुपाची धार
तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा
जोड्यात हलगडी, हलगाडीत बलगडी
बलगडीत पिंजरा, पिंजर्यात रघु
राघूच्या तोंडी उंबर... रावांचं नाव ऐकलंत ना, मग काढा रुपये शंभर..
- श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली
... रावांच्या नावाने मंगळागौर मी पुजली
- श्रावण महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट
... रावांचं नाव घ्यायला मी कशाला बघू वाट
- सासरचा गाव चांगला
गावामध्ये बंगला
बंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोण
द्रोणात तूप, तुपासारखं रूप
रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढा
चंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावं
आणि.. रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर फिरवावं
- मंगळागौरीचे खेळ खेळू, फुगड्या, कोंबडा, पिंगा
.. रावांचं नाव घ्यायला मला कधीही सांगा
- सागर तेथे सरिता कवी तेथे कविता----- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता
- मान राखून तुमचा, मैत्रिणींनो घेते मी उखाणा … रावांचं नाव घ्यायला लागत नाही मला बहाणा
(हेही वाचा- Shravan 2019: श्रावण महिन्यातील मंगळागौर का आहे नवविवाहितेसाठी खास; यंदा कधी कराल साजरी?जाणून घ्या)
- स्वर्गीय नंदनवनात आहेत सोन्याच्या केळी.. रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या वेळी
- 1.. 2... 3... .. रावांचं नाव घेते करा मला फ्री
यंदा नागपंचमी पाठोपाठ मंगळागौर या सणाला सुरुवात झाली असून नवविवाहित मुलींचा उत्साह ही तितकाच वाढला आहे. नवविवाहित मुलींसोबत महिलाही एकत्र मोठ्या आनंदात आणि उत्साहात मंगळागौरीचा खेळ खेळतात. यात एकाहून एक सरस गाणी गायली जातात, फुगड्या घातल्या जातात. महिलांना रोजच्या कामातून थोडा वेगळा स्वत:साठी वेळ मिळावा, त्यात त्यांनी स्वत:ची आवड जोपासता यावी हे यामागचे उद्देश असते.