Mahaparinirvan Din 2021 Chaityabhoomi Live Streaming: महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरबसल्या करा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; 'या' ठिकाणी पाहू शकाल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
Dr.Babasaheb Ambedkar (Photo Credits: commons.wikimedia.org)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात येत असलेल्या तयारीसह, थेट प्रक्षेपण व्यवस्थेची त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी नुकतीच पाहणी केली. यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे सोमवार, 6 2021 रोजी चैत्यभूमी येथे होणाऱ्या शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी 7.45 ते सकाळी 10 कालावधीमध्ये केले जाणार आहे.

सकाळी 9.50, 10.50, 11.50 तसेच दुपारी 12.50 वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूट्यूब:https://bit.ly/6december21YT/ फेसबूक: ttps://bit.ly/6december21FB / ट्विटर: https://bit.ly/6december21TT या लिंकचा उपयोग करता येईल.

दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. तसेच, डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तेथेही व्यवस्था करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे ही सर्व कामे पूर्णत्वास आली आहेत. (हेही वाचा: महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी)

कोविड-19 विषाणू संसर्ग नियंत्रणात आला असला तरी कोविडच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचा धोका निर्माण झाल्याने दक्षता बाळगणे आवश्यक झाले आहे. ओमायक्रॉन हा अत्यंत वेगाने संक्रमित होणारा कोविड विषाणू प्रकार असल्याने, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन शासनाकडून आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.