Khandoba Navratri 2020: खंडोबा नवरात्री यंदा 15 डिसेंबर पासून; जाणून घ्या देवदीपावली, चंपाषष्ठी कधी?
खंडोबा मंदिर जेजुरी पुणे | Photo Credits: wikipedia.org

मराठी महिन्यांमध्ये श्रावणापाठोपाठ मार्गशीर्ष महिना हा देखील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा महिना मानला जातो. खंडोबाच्या भाविकांसाठी हा मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदीपावली (Dev Deepavali) साजरी करून पुढे चंपाषष्ठी (Champa  Shashti) पर्यंत खंडोबा नवरात्री (Khandoba Navratri)  सण साजरा केला जातो. यंदा 14 डिसेंबरला सोमावती अमावस्या झाल्यानंतर 15 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात होत आहे. हा दिवस देवदीपावली म्हणून देखील साजरा केला जातो. तर चंपाषष्ठी यंदा 20 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. Jejuri Somvati Amavasya Yatra 2020: जेजुरी येथील खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द; तीन दिवस भाविकांना शहरात प्रवेशबंदी.

जेजुरीला मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. यामध्ये पहिल्याच दिवसापासून पुढील 6 दिवस दिवे, नंदादीप लावले जातात, यामुळे मंदिर परिसर उजळून निघतो. देवदीपावली हा खंडोबाच्या देवळामध्ये साजरा केला जाणार्‍या महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे.

चंपाषष्ठी यंदा 20 डिसेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. दरम्यान मणी आणि मल्ल या दोन असूरांचा खंडोबाने खात्मा करून लोकांना जाचातून सोडवलं त्याच्या समरणार्थ चंपाषष्ठी साजरी केली जाते.

इतर शारदीय आणि चैत्र नवरात्री प्रमाणेच या मल्हारी किंवा खंडोबा नवरात्री मध्येदेखील घटस्थापना कराण्याची, प्रत्येक दिवशी एक एक माळ वाढवण्याची प्रथा आहे. दरवर्षी हा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभवाने, भाविकांच्या जनसमुदयामध्ये साजरा केला जातो. मात्र यंदा इतर सणांप्रमाणेच यावरही कोरोनाचं संकट असल्याने ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत साधेपणाने ही खंडोबा नवरात्र साजरी केली जाणार आहे.