Jejuri Somvati Amavasya Yatra 2020: जेजुरी येथील खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द; तीन दिवस भाविकांना शहरात प्रवेशबंदी
Jejuri Khandoba Temple | (Photo Credits: Facebook)

जेजुरीच्या खंडोबाची (Jejuri Khandoba) सोमवती अमावस्या यात्रा (Somvati Amavasya Yatra) रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर शनिवार, 12 ते सोमवार 14 डिसेंबर पर्यंत भाविकांना जेजुरीत प्रवेश नाकारण्यात आला आहे. जेजुरी येथील खांदेकारी, मानकरी आणि ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.

सोमवार, 14 डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवती यात्रा, पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसंच कोणत्याही परिस्थितीत भाविकांनी जेजुरीत येऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या नियामाचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग तीन दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहेत. मंगळवार, 15 डिसेंबरपासून हे मार्ग पुन्हा भाविकांसाठी खुले केले जातील.

पोलिस प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी विश्वस्त मंडळ करेल, असा विश्वास विश्वस्त संदीप जगताप यांनी दिला आहे. त्याचबरोबर कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी निर्णयाचे पालन करुन तीन दिवस जेजुरीत येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Mhaswad Yatra 2020: म्हसवड यात्रा भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार, केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी)

सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. यावर्षी देखील किमान अडीच ते तीन लाख भाविक जमले असते, असा अंदाज होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे गरजेचे असल्याने यात्रा रद्द करुन भाविकांना प्रवेश बंदी करण्याचा स्त्युत्य निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यापूर्वी कोविड-19 संकटामुळेच 20 जुलै रोजी होणारी खंडोबाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली होती.

सोमवती अमावस्या यात्रा रद्द केली असली तरी मंगळवार पासून सुरु होणाऱ्या चंपाषष्टी उत्सवानिमित्त भाविकांना खंडोबाचे मुखदर्शन घेता येणार आहे. पाच दिवसांच्या या उत्सवकाळात सर्व पूजा प्रथेप्रमाणे केल्या जातील. तसंच अन्नदानही केले जाईल. दरम्यान, यापूर्वी कोविड-19 संकटामुळे अनेक सण, उत्सव, यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. बेळगाव येथील यल्लमा देवीची यात्रा रद्द करण्यात आली असून मंदिरही 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.