कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी घालून दिलेल्या विविध नियमांचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कटाक्षाने पालन करण्यावर भर दिला जात आहे. या नियमांचा फटका राज्यभरातील यात्रा, जत्रा, उरुस आणि उत्सवांना बसतो आहे. यंदा म्हसवड यात्रेलाही (Mhaswad Yatra 2020) नियमांचा फटका बसताना दिसत आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने म्हसवड येथील सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतू, यात्रा, रथोत्सवासही परवानगी नाकारल्याचे समजते. दरम्यान, केवळ म्हसवड यात्रा (Mhaswad Yatra) नव्हे तर जिल्ह्यातील इतरही सर्व यात्रा उत्सवांना परवानगी नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे.
कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे सर्वच व्यवहार जवळपास ठप्प झाले. प्रदीर्घ काळानंतर सरसारने आता कुठे मोकळीक दिली आहे. असे असले तरी अद्यापही गर्दीच्या ठिकाणांवर कार्यक्रमांवर मोठ्या मर्यादा आहेत. त्यामुळेच राज्यात मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी अद्यापही यात्रा, जत्रा, उरुस, उत्सव भरविण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. राज्य सरकारच्या आदेशांचे पलन करत जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यात अशा उत्सवांना परवानगी नाकारली आहे. (हेही वाचा, Covid-19 च्या पार्श्वभूमीवर बेळगाव मधील यल्लमा देवीची यात्रा रद्द; 31 डिसेंबर पर्यंत मंदिरही राहणार बंद)
सातारा जिल्ह्यातील म्हसवड यात्रा ही केवळ पंचक्रोशीच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि सांगली सोलापूर जिल्ह्यांसह राज्यभर प्रसिद्ध आहे. या यात्रेस राज्य आणि देशभरातून भाविक येत असतात. ही यात्रा मोठी असल्याने या ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यासोबतच लाखोंची गर्दीही जमलेली असते. कोरोना व्हारसस संकटाच्या पार्श्वभूमीवर अशी गर्दी जमने धोकादायक असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. परिणामी जिल्हाधिकारी, तसेच संबंधित तालुक्यांतील प्रांताधिकाऱ्यांनी लेखी अध्यादेश काढून गावोगावच्या यापूर्वीच्या यात्रा रद्द केल्या आहेत.
दरम्यान, सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. याचा अर्थ आता जत्रांनाही सरकार परवानगी देईल असा विश्वास व्यक्त करत विविध व्यवसायिक, हातावर पोट असलेले नागरिक यात्रेसाठी म्हसवड येथे दाखल होऊ लागले आहेत. प्रशासनाने जर यात्रेवरील बंदी कायम ठेवली तर या सर्वांनाच निराशेने रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे.