Covid-19 च्या पार्श्वभूमीवर बेळगाव मधील यल्लमा देवीची यात्रा रद्द; 31 डिसेंबर पर्यंत मंदिरही राहणार बंद
Yallama Devi Temple in Belgaum (Photo Credits: Facebook)

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील बंद असलेली मंदिरं पुन्ह सुरु करण्यात आली. परंतु, याला बेळगावातील (Belgaum) यल्लमा देवीचे मंदिर (Goddess Yallama Temple) अपवाद ठरले आहे. त्याचबरोबर यल्लमा देवीची पहिली पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी सौंदत्ती येथील यल्लमा देवीचे मंदिर 31 डिसेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे 30 डिसेंबर रोजी होणारी यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच सौंदत्ती श्री यल्लमा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 9 महिन्यांपासून मंदिरं बंद आहेत. टप्पाटप्प्याने इतर सुविधा सुरु झाल्या आहेत. मंदिरं ही उघडली आहेत. मात्र यल्लमा देवीचं मंदिर अद्याप बंद असल्याने यात्रेनिमित्त कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश येथून येणारे लाखो भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार नाही. तसंच यात्रेनिमित्त कोल्हापूर, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातूनही लाखो भाविक हजेरी लावतात. मात्र यंदा यात्राही रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, या आदेशाला सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थानचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी केले आहे.

यापूर्वी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सण-समारंभही साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. सध्या राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी संसर्ग वाढणार नाही, यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 18,32,176 इतका झाला असून त्यापैकी 16,95,208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 88,537 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकूण 47,357 मृतांची नोंद झाली आहे.