महाराष्ट्रात कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अवघ्या काही तासांमध्ये हा सोहळा सुरू होणार आहे. यंदाही भाविकांच्या गर्दीने पंढरपूर (Pandharpur) नगरी फुलून गेली आहे. परतीच्या पावसाच्या फटक्याने अनेक भाविकांनी पाठ फिरवली आहे पण यंदा कार्तिकी एकादशी देखील कोरोना निर्बंधमुक्त वातावरणामध्ये हा सण साजरा होणार आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन (Vitthal Rukmini Darshan) घेण्यासाठी लाखो वारकरी ताटकळत आहेत.
कार्तिकी एकादशीला प्रथेप्रमाणे विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस ही पूजा करणार आहेत. त्यासाठी दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. आज रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत सामान्य भाविकांना दर्शन घेता येणार नाही. उपमुख्यांच्या हस्ते होणारी पूजा पहाटे 2.20 पासून त्यांच्या आगमनानंतर सुरू होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री संदीपान भुमरे , खासदार रणजित निंबाळकर, आमदार समाधान अवताडे उपस्थित असणार आहेत. Kartiki Ekadashi 2022 Marathi Abhang: कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाचे खास मराठी अभंग, पाहा व्हिडीओ .
विठ्ठलापाठोपाठ रुक्मिणीमातेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्यानंतर पहाटे साडे तीन वाजता विठ्ठल सभामंडपात उपमुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार होणार आहे. पहाटे 4 नंतर सामान्य नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल.
कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे.