Happy 4th of July: आज अमेरिका साजरा करत आहे आपला 245 वा स्वातंत्र्यदिन; जाणून घ्या काय आहे या दिवसाचा इतिहास
Fourth of July (Photo Credits: Pixabay)

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (US) आज आपला 245 वा स्वातंत्र्यदिन (US Independence Day 2021) साजरा करीत आहे. 4 जुलै, 1776 रोजी अमेरिकन कॉंग्रेसने ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली होती, त्यानंतर अमेरिकेत दरवर्षी 4 जुलै रोजी 'स्वातंत्र्य दिन' साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. सर्वसाधारणपणे अमेरिकेमध्ये हा दिवस परेड आणि बार्बेक्यूचा आनंद घेत साजरा केला जातो. या दिवशी अमेरिकन लाल, पांढरे आणि निळे कपडे घालतात. याशिवाय अमेरिकन इतिहास आणि परंपरा आठवून या दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात, आतिषबाजी केली जाते.

इतिहास -

तर, प्रसिद्ध नाविक ख्रिस्तोफर कोलंबस यांनी 1492 मध्ये अमेरिका खंडाचा शोध लावला. यानंतर युरोपियन देशांमधून इकडे अनेक लोक येऊ लागले. ब्रिटन त्यावेळी महासत्ता होता आणि बर्‍याच देशांत त्यांच्या वसाहती होती. अमेरिकेमध्येही ब्रिटीशांचे आगमन झाले व हळू हळू इथल्या मूळ लोकांशी भांडणही सुरू झाले. ब्रिटिश सरकारने अमेरिकेत अनेक कठोर कायदे केले जे स्थानिक रहिवाशांच्या हिताचे नव्हते. परिणामी, अमेरिकन लोकांना बंड करण्यास भाग पाडले गेले. इथल्या लोकांनी ब्रिटीशांच्या राजवटीपासून मुक्तीसाठी दीर्घ संघर्ष केला.

अमेरिकेत ब्रिटनचा विरोध 1765 मध्येच सुरू झाला. 16 डिसेंबर 1773 रोजी अमेरिकेतील 'बोस्टन टी पार्टी'च्या घटनेने ब्रिटनविरूद्ध बंडखोरीला चिथावणी दिली. या घटनेच्या तीन वर्षांनंतर 4 जुलै 1776 रोजी फिलाडेल्फिया येथे झालेल्या दुसर्‍या कॉन्टिनेंटल कॉंग्रेसमध्ये ब्रिटनपासून अमेरिकेचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.

अमेरिका हा जरी आजचा जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असला तरी, एकेकाळी तोही ब्रिटीशांचा गुलाम होता. आजच्याच दिवशी 245 वर्षांपूर्वी 1776 मध्ये ग्रेट ब्रिटनच्या सुमारे 13 वसाहतींनी एकत्रितपणे आपले स्वातंत्र्य घोषित केले, यालाच ‘डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडंस’ म्हटले जाते.

मात्र ब्रिटिशांनी इथेच हार मानली नाही, त्यांनी सहजा सहजी अमेरिकेला स्वातंत्र्य देण्यास नकार दिला व यासाठी अमेरिकेला युद्ध लढावे लागले. अमेरिकेत स्वातंत्र्यलढ्याचा कालावधी 1776 ते 1783 दरम्यानचा मानला जातो. 1781 मध्ये अमेरिका आणि फ्रान्सच्या एकत्रित सैन्याने लॉर्ड कॉर्नवालिसच्या नेतृत्वात ब्रिटीश सैन्याचा पराभव केला आणि यासह ब्रिटनने अमेरिकेवर आपला दावा सोडला. मात्र अमेरिकेत 4 जुलै रोजीच स्वातंत्रदिन साजरा केला जातो. (हेही वाचा: Swami Vivekananda Punyatithi 2021: स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांचे विचार, जे तुमच्या विचारांना घालतील खत-पाणी)

दरम्यान, 4 जुलै 1776 रोजी डेलावेर, पेनसिल्व्हेनिया, न्यू जर्सी, जॉर्जिया, कनेक्टिकट, मॅसेच्युसेट्स बे, मेरीलँड, दक्षिण कॅरोलिना, न्यू हॅम्पशायर, व्हर्जिनिया, न्यूयॉर्क, नॉर्थ कॅरोलिना आणि रोड आइसलँड यांनी ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केले. त्यानंतर स्वतंत्र अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वात ब्रिटीश साम्राज्याविरूद्धची लढाई लढली गेली. जगातील पहिली लिखित राज्यघटना अमेरिकेत 1789 मध्ये अंमलात आली. सध्या अमेरिकेत 50 राज्ये आहेत.