थोर विचारवंत, मार्गदर्शक, युवकांचे प्रेरणा स्थान असे स्वामी विवेकानंद यांची उद्या पुण्यतिथी (Swami Vivekananda Punyatithi 2021). कोलकत्ता सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांनी शुक्रवार, 4 जुलै ४, 1902 रोजी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. स्वामी विवेकानंदांनी आपल्या अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर जगाला मानवतेची शिकवण दिली. ते एक महान भारतीय हिंदू विचारवंत होते. वयाच्या अगदी लहानपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. पुढे रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ सुरू केले.
लहानपणीच विवेकानंद म्हणजेच नरेंद्रने सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. शिक्षणानंतर रामकृष्ण परमहंस यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर नरेंद्रचे संपूर्ण जगच बदलले. त्यांनी हिंदू धर्म व भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभुमीवर, 11 सप्टेंबर 1893 सालचे त्यांचे शिकागो येथील भाषणाचे आजही दाखले दिले जातात.
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे काही अनमोल विचार पाहूया जे तुम्हाला, तुमच्या विचारांना नक्कीच खत-पाणी पुरवतील.
- ‘स्वतः चा विकास करत रहा. लक्षात ठेवा गती आणि वाढ ही तर जिवंतपणाची लक्षणे आहेत.’
- सामर्थ्य जीवन आहे तर दुर्बलता मृत्यू. विस्तार जीवन आहे तर आकुंचन मृत्यू. प्रेम म्हणजे जीवन तर म्हणजे मृत्यू.
- आपण चालत असलेल्या मार्गावर जर अडचणी येत नसतील तर निश्चितच आपण चुकीच्या मार्गावर चालत आहात.
- तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही, तुम्हाला कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही. आपल्याला स्वत:च्या आतून सर्व काही शिकावे लागेल. आत्म्यापेक्षा श्रेष्ठ शिक्षक दुसरा कोणीही नाही.
- दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमवाल.
- तुम्ही जोखीम उचलण्याचे भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता.
- वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.
- जे लोक नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
- जेव्हा लोक आपल्याला शिव्या देतात तेव्हा आपण त्यांना आशीर्वाद द्या. आपल्या चुका दाखवून ते आपल्याला किती मदत करीत आहेत याचा विचार करा.
- जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.
- आपण आज जे आहोत ते आपल्या विचारामुळे, म्हणून आपण काय विचार करतो याकडे लक्ष द्या. शब्द दुय्यम असतात. विचार आपल्यासोबत शेवटपर्यंत प्रवास करत असतात. (हेही वाचा: ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून प्रजासत्ताक दिन 2022 सोहळ्यात 25 देशांमधील तरुण सहभागी होणार)
दरम्यान, स्वामी विवेकानंद यांनी ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञान योग’ सारख्या ग्रंथाची रचना करुन तरुण पिढीला नवीन मार्ग दर्शवला. अशाप्रकारे वेदांत आणि योग यांच्या भारतीय तत्त्वज्ञानाची पाश्चिमात्य जगात ओळख करुन देणारे ते महान पुरुष होते.