Durga Puja 2019: दुर्गा पूजा का साजरी केली जाते? जाणून घ्या महत्व
देवी दुर्गा (Photo Credits-Facebook)

सध्या सर्वत्र नवरात्रौत्सव सणाला सुरुवात झाली असून आनंदाने वातावरण सगळीकडे दिसून येत आहे. तर पुढील चार दिवस अजून देवी मातेची मनोभावे पूजा करण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यात नवरात्रौत्सव साजरा करण्याची परंपरा आणि त्यांच्या विधी पूजा निराळ्या आहेत. तर पश्चिम बंगाल येथे दुर्गा पूजेचे आयोजन मोठ्या स्तरावर करण्यात येते. या दुर्गापूजादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच हिंदू पंचांगानुसार दूर्गा पूजा करण्याची वेळ ठरवण्यात येते.

हिंदू पुराणानुसार, राक्षासांमधील सर्वात शक्तिशाली महिषासुर नावाचा एक राक्षस होता. स्वर्गावर आपले आधिपत्य स्थापन करण्यासाठी त्याने ब्रम्ह देवाचे घोर तपस्या केली. त्यामुळे ब्रम्ह देवाने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. यावर महिषासुराने अमरत्व मिळावे असा वर मागितला. मात्र ब्रम्हाने महिषासुराच्या या वराला नकार दिला आणि तुझा मृत्यू एका स्री कडून होईल असे वरदान दिले. यावर मला कोण मारणार असा आत्मविश्वास दाखवत मिळालेल्या अमरत्वाचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर काही काळाने महिषासुर स्वर्गावर आक्रमण करत देवलोकात हाहाकार माजवतो. या प्रकारामुळे सर्व देव त्रिदेव यांच्याकडे जात आलेल्या संकटातून वाचवा अशी विनवणी करु लागतात. यावर ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांच्याद्वारे एक आंतरिक शक्ती निर्माण केली जाते. ही निर्माण झालेली शक्ती स्री रुपी असून ती सर्वांसमोर प्रकट होते. त्रिदेवांनी निर्माण केलेल्या दुर्गेचे महिषासुरासोबत भयंकर युद्ध सुरु होते. या दोघांमधील हे युद्ध अश्विन महिन्याती शुक्ल पक्षाच्या दशमीला तिथीला संपून या दिवशी महिषासुराचा दुर्गा मातेकडून वध केला जातो. त्यामुळेच या दिवसाला वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आनंद व्यक्त केला जातो.

दुर्गा पूजा दरम्यान उत्तर भारतात नवरात्रौत्सवासह दशमीच्या दिवशी श्री राम यांच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यात येतो. तर पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यात विविध प्रकारे दुर्गा पूजा केली जाते. राक्षस महिषासुराचा वध देवी मातेने केल्यामुळेच या दिवसाला 'विजयादशमी' म्हणून साजरा केले जात असल्याची मान्यता आहे.(‘या’ शहरात बनत आहे 13 फुट उंच, तब्बल 50 किलो सोन्याची दुर्गा देवीची मूर्ती; किंमत ऐकून व्हाल थक्क)

त्यामुळे दुर्गा पूजेचे महत्व समाजामध्ये फार असून त्याचा आनंद मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दुर्गा पूजा अश्विन शुद्ध षष्ठी (6 ऑक्टोंबर) ला केली जाते. तर दशमीच्या दिवशी दुर्गा पूजेची समाप्ती होते. या उत्सवाच्या वेळी सर्व देवी मातेच्या मंदिरात दुर्गा पाठ, जागरणाचे आयोजन केले जाते.