‘या’ शहरात बनत आहे 13 फुट उंच, तब्बल 50 किलो सोन्याची दुर्गा देवीची मूर्ती; किंमत ऐकून व्हाल थक्क
दुर्गादेवी (Photo Credit : Pixabay)

29 सप्टेंबरपासून, देशभरात नवरात्रीच्या (Navratri 2019) उत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. देशभरात विविध ठिकाणी विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये हा उत्सव दुर्गापूजा या नावाने साजरा होतो. या काळात सार्वजनिकरित्या देवीची प्रतिमा बसवली जाते. कोलकाता (Kolkata) सारख्या मोठ्या शहरात दरवर्षी मोठ्या कल्पकतेने देवीची मूर्ती, मंडप, आरास पाहायला मिळते. यावर्षी कोलकाता शहरातील एका मंडळाने तब्बल 50 किलो सोन्याची देवीची मूर्ती बसवली आहे. सध्या देशभरात याच मूर्तीची चर्चा आहे. 4 ऑक्टोबर रोजी ही मूर्ती मंडपामध्ये विराजमान होईल.

13 फूट उंचीची ही मूर्ती बनवण्यासाठी साधारण 20 कोटी रुपये खर्च आला आहे. संतोष मित्र चौकात असलेल्या मंडपामध्ये या मूर्तीची स्थापना केली जाईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही मूर्ती बसवण्यासाठी मंडळाकडून मदत केली गेली नाही, विविध सोनार एकत्र येऊन त्यांनी ही मूर्ती बनवण्यासाठी सोने पुरवले आहे. या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर त्यांना सोने परत देण्यात येईल. यासह अनेक बड्या कंपन्यांनीदेखील ही मूर्ती बनवण्यास, तसेच दुर्गा पूजा महोत्सवासाठी निधी दिला आहे. यापूर्वी 2017 मध्ये या दुर्गा समितीने दुर्गा माँच्या मूर्तीला सोन्याची साडी परिधान केली होती. तर, गेल्या वर्षी ही मूर्ती चांदीच्या रथांत बसविण्यात आली होता. (हेही वाचा: Navratri 2019: भारतातील एकमेव मंदिर, जिथे साजरा होतो योनीरुपातील देवीच्या मासिक पाळीचा उत्सव; जाणून घ्या या शक्तीपीठाबद्दल आश्चर्यकारक माहिती)

या देवीसाठी तब्बल 200 कारागीर अडीच महिन्यापासून मंडळाची उभारणी करत आहेत. या मंडपामध्ये चंद्रोदय मंदिराची प्रतिकृती तयार केली जाईल. मूळ मंदिर 2022 मध्ये पूर्ण होणार आहे, तसेच जगातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होईल. या सोबतच शिश महलप्रमाणे आतून मंडप सजवण्यासाठी कित्येक टन काचा वापरल्या जात आहेत. या मूर्तीला कनकची दुर्हा असे नाव देण्यात आले आहे.