Diwali 2019: नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान नंतर कारीट का फोडतात? जाणून घ्या या प्रथेमागील पौराणिक अख्यायिका
कारीट (Photo Credits: Facebook)

दिवाळीची (Diwali 2019)  पहिली आंघोळ आणि अभयंगस्नान याविषयी प्रत्येकाच्याच खास आठवणी असतात. पहाटे लवकर उठून सुगंधी उटण्याने आंघोळ करणे असो वा मित्रमंडळी आणि परिवारासोबत एकत्र बसून फराळाचा आस्वाद घ्यायचा असो या प्रत्येक गोष्टी दिवाळ सणाची रंगत वाढवतात. यातीलच एक खास बात म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभयंगस्नान करून घराबाहेर कारीट (Karit) फोडणं. आपण सर्वानीच हा प्रकार प्रत्यक्ष केला किंवा निदान ऐकला तरी असेलच पण यामागची आख्यायिका तुम्हाला ठाऊक आहे का? हिंदू पुराणांनुसार कारीट फोडणे यामागे एक समर्पक अर्थ दडला आहे. यंदाच्या दिवाळी वेळापत्रकानुसार उद्या म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशीचा (Narak Chaturdashi) मुहूर्त आहे, यानिमित्ताने पूर्वापार चालत आलेल्या या परंपरेच्या मागील नेमके कारण आणि कथा मात्र एकदा नक्की जाणून घ्या..

हिंदू पौराणिक कथांनुसार पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे नरकासुर नावाचा एक असूर राज्य करत होता. हा नरकासुर देव, माणूस, स्त्रिया कोणालाही न बघता त्रास देत असायचा. असं म्हणतात की त्याने सोळा सहस्त्र उपवर राजकन्या जिंकून त्यांना एका कारागृहात कोंडून ठेवले होते. नरकासुराच्या या वागणूकीमुळे सर्वत्र हाहाःकार उडाला होता. हे समजताच श्रीकृष्णाने नरकासुरावर आक्रमण केले. त्याचा वध करुन सर्व राजकन्यांना मुक्त केले. मात्र मरताना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की, "आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल, त्याला नरकात पीडा होऊ नये." कृष्णाने नरकासुराला तसा वर दिला. त्यामुळे कार्तिक वद्य चतुर्दशी ही 'नरक चतुर्दशी' म्हणून मानली जाऊ लागली आणि त्या दिवशी लोक सुर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करु लागले.

आपण आज सुद्धा जे कारीट फळ फोडतो ते एक जंगली फळ आहे आणि म्ह्णूनच ते नरकासुराचे प्रतीक म्ह्णून डाव्या पायाच्या अंगठ्याने ठेचले जाते. तसेच यानंतर द्राक्षाचे रक्त या रूपात कारीटाचा किंचित गर जिभेला लावला जातो.

Diwali Abhyang Snan 2019 Shubh Muhurat: नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘हा’ आहे अभ्यंग स्नानाचा मुहूर्त, जाणून घ्या कसे करावे अभ्यंग स्नान

कारीट फोडण्याची परंपरा मुख्यत्वे कोकण प्रांतात पाळली जाते. या फळाला वेगवेगळी नावे आहेत काही ठिकाणी कारीट आणि चिराटे ही दोन नावे प्रचलित आहेत दिवाळीत कारीट फोडताना एक परंपरा म्हणून कारटाकडे न पाहता त्यामागची भावना समजून घ्यायला हवी आणि आपल्यातले दुर्गणही बाजूला सारायला हवेत. या कारटांना दिवाळीच्या दिवशी फोडण्यासाठी म्हणून मोठी किंमत आली आहे. दरम्यान, आज नरक चतुर्दशी सोबतच लक्ष्मीपूजनाचा योग देखील जुळून आला आहे, ज्यामुळे या दिवसाचे माहात्म्य आणखीनच खास आहे.