अमेरिका: व्हाईट हाऊसवर यंदा दिवाळी नाही; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंधरा वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत
पंधरा वर्षांची परंपरा मोडीत, व्हाईट हाऊसवर यंदा दिवाळी नाही. (संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

ऐन दिवाळीच्या काळात दिवे आणि विद्यूत रोषणाईने उजळून निघणारे व्हाईट हाऊस यंदा पहिल्यांदाच सुनेसुने भासत आहे. गेली पंधरा वर्षे व्हाईट हाऊसवर दिवाळी साजरी केली जाते. मात्र, ही परंपरा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यंदा खंडीत केली. अमेरिकेत सध्या महत्त्वाच्या असलेल्या मध्यवधी निवडणुकांमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पण, गेल्याही वर्षी ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्येच पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलन करुन दिवाळी साजरी केली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी २००३मध्ये व्हाईट हाऊसवर दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरु केली. ही परंपरा पुढे बराक ओबामांनीही आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात कायम ठेवली होती.

दरम्यान, यंदाच्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प निवडणुक प्रचारात व्यग्र असणार आहेत. त्यामुळे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनीच सरकारच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांचे देशाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान असल्याचे त्यांनी शुभेच्छा देताना बुधवारी सांगितले. आपल्या शुभेच्छा संदेशात पोम्पीयो यांनी सांगितले की, दिवाळीचा उत्सव साजरा करताना लोक जसे पणत्या लाऊन घरांना सजवतात. तसेच, मी आमच्या त्या सर्व मित्रांच्या योगदानाचे कौतुक करतो ज्यांनी देशाच्या (अमेरिका) उभारणीत मोलाचे योगदान दिले. (हेही वाचा, अमेरिका मध्यावधी निवडणूका निकाल 2018: डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, सिनेटवर वर्चस्व पण हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमोक्रॅटीक पक्षाची मुसंडी)

दरम्यान, अमेरिकेत झालेल्या निवडणूक निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना चांगलाच झटका बसला आहे. या निवडणुकीतील निकालानंतर डेमोक्रेटिक पक्षाचे कनिष्ठ सभागृहातील संख्याबळ घटणार असे दिसते.