Dhanteras 2021 | File Images

दिवाळीच्या 5 दिवसांच्या आनंदपर्वाची आजपासून सुरूवात झाली आहे. आज (2 नोव्हेंबर) दिवशी धनतेरस चा सण साजरा केला जात आहे. धनतेरस (Dhanteras) किंवा धनत्रयोदशी (Dhantrayodashi) हा दिवस कुबेर जयंती (Kuber Jayanti) म्हणून साजरी करण्याचा दिवस आहे. हिंदू धर्मीय आजच्या दिवशी सोन्याच्या, चांदीच्या वस्तू किंवा किमान घरात नवी भांडी अशी खरेदी करतात. धनत्रयोदशी दिवशी कुबेर आणि लक्ष्मी मातेचं पूजन केले जाते. अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला एक दिवा देखील लावण्याची प्रथा आहे. मग आजच्या दिवशी यमदीपदान ते नव्या वस्तूंची खरेदी या सार्‍यासाठी तुम्ही शुभ मुहूर्ताच्या शोधात असाल तर आज पहा कधी आणि काय करू शकाल खरेदी?

धनतेरस हा सण अश्विन कृष्ण त्रयोदशी दिवशी साजरा केला जातो. यंदा 2 नोव्हेंबरला त्रयोदशी 11.31 मिनिटं ते 3 नोव्हेंबर दिवशी सकाळी 9 वाजून 2 मिनिटं अशी आहे. ही पूजा प्रदोष काळी करण्याची पद्धत आहे. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:05 ते रात्री 8:36असा आहे. Dhanteras 2021 HD Images: धनत्रयोदशी निमित्त Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून मित्रपरिवाला द्या शुभेच्छा!

धनतेरस 2021 खरेदीचा शुभ मुहूर्त

सोन्या, चांदी सारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी तुम्ही चांगला मुहूर्त पाहून करण्याच्या तयारीत असाल तर आज त्रिपुष्कर योग आहे. धनतेरसचा मुहूर्त साधत सोन्या-चांदीची खरेदी करत असाल तर संध्याकाळी 6 वाजून 05 मिनिटं ते 8 वाजून 36मिनिटं हा शुभ काळ आहे. तुम्हांला सकाळच्या वेळेस खरेदी करायची असल्यास 11 वाजून 30 मिनिटांपासून पुढे खरेदी केली जाऊ शकते. प्रामुख्याने राहुकाळात खरेदी केली जात नाही. हा काळ दुपारी 2 वाजून 50 मिनिटं ते 4 वाजून 12 मिनिटं असा आहे. घरात भांडी किंवा इतर वस्तू खरेदीचा काळ हा संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटं ते रात्री 8 वाजून 15 मिनिटं असा आहे.

यमदीपदान मुहूर्त

यमदीपदान हा देखील धनत्रयोदशी दिवशीचा महत्त्वाचा भाग असतो. घरात अकाली मृत्यू टाळण्यासाठी दिवाळीत धनतेरस दिवशी दक्षिण दिशेला यमराजासाठी एक दिवा लावण्याची पद्धत आहे. हा कणकेचा दिवा बनवून पेटवला जातो. यंदा यमदीपदान हे संध्याकाळी 5.35 ते 6.53 या काळात केले जाते.

धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी कुबेर आणि लक्ष्मी मातेसोबतच आरोग्य जपण्याची आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची देखील पूजा करण्याची प्रथा आहे. आयुर्वेदाचे अभ्यासक धन्वंतरी पूजन देखील करतात.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. लेटेस्टली मराठी त्यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टि करत नाही.