आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी (Worli) परिसरात भाजप आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दहीहंडी (Dahi Handi 2023) सोहळ्याचे आयोजन केले आहे. दरवर्षी जांबोरी मैदान (Jambori Maidan) या ठिकाणी यूबीटी सेना दहीहंडीचे आयोजन करत होती, मात्र आता ही जागा भाजपकडे गेली आहे. आता यूबीटी सेनेला दहीहंडीचा उत्सव इतरत्र आयोजित करावा लागणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजपने जनतेचा विश्वास आपल्या बाजूने संपादन करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु केले आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही भाजपला जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाली आहे. या ठिकाणी दरवर्षी यूबीटी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर दहीहंडी साजरी करायचे. आता भाजपच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही वरळी परिसरात यूबीटी सेनेला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाण्यातील शिवसेनेच्या एका आमदाराने गुरुवारी प्री-गोविंदा स्पर्धा आयोजित करून स्पर्धेसाठी एनएससीआयचे बुकिंग केले आहे. यंदा 06 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी आहे आणि 07 सप्टेंबर रोजी भारतात दहीहंडी साजरी केली जाईल. भाजपचे संतोष पांडे यांनी फेब्रुवारी महिन्यातच दहीहंडीसाठी जांबोरी मैदान बुक केले आहे. भाजपने विजेत्यासाठी 33 लाख 33 हजार रुपये ठेवले आहेत. आठ थर लावणाऱ्या मंडळाला 51 हजार रुपये आणि सात थरांसाठी 11 हजार रुपये आणि सहा थरांसाठी पाच हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. (हेही वाचा: राज्यातील 75,000 गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; शासनाकडून 18,75,000 रुपयांचा निधी मंजूर)
प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक याला राज्य सरकारच्या मदतीने एनएससीआयमध्ये प्रो-गोविंदा लीग आयोजित करण्याची परवानगी मिळाली आहे. ठाण्यात मंगळवारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, ठाणे आणि मुंबईतील निवडक मंडळे गुरुवारी प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यंदाच्या दहीहंडी बद्दल FPJ ने सचिन अहिर यांना विचारले तेव्हा त्यांनी. आम्ही यावर्षी दहीहंडी साजरी करणार नसल्याचे सांगितले.