Dahi Handi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दहीहंडी उत्सव (Dahi Handi 2023) व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर 75 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. लीग स्पर्धेचे आयोजन करणेबाबत मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 जुलै 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीतील दहीहंडी उत्सवामध्ये तसेच प्रो- गोविंदा लीग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण 50,000 गोविंदाना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र यासंदर्भात अतिरिक्त 25,000 गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी होत आहे.

यानुषंगाने सराव व प्रशिक्षण असलेल्या तसेच प्रत्यक्षात भाग घेणाऱ्या अतिरिक्त 25,000 गोविंदांना विमासंरक्षण देण्याची बाव शासनाच्या विचाराधीन होती. आता याबाबत काही निर्णय घेण्यात आले आहेत. दहिहंडी उत्सव/प्रो-गोविंदा लीग मधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात/दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यातूनच काही गोविंदांना अपघात होऊन, गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू घडून येण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्‍यता निर्माण होते. यासाठी एकूण 75,000 गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या विमा संरक्षणासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला प्रति गोविंदा रु. 75/- विमा हप्ता याप्रमाणे एकूण 18,75,000 रु. इतका निधी अदा केला जाणार आहे. सदर योजनेंतर्गत विमा संरक्षणाचे स्वरुप हे संदर्भाधिन दिनांक 18 ऑगस्ट, 2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या तरतूदीनुसार व संबंधीत विमा कंपनीच्या अटी/शर्तींनुसार राहील. विमा संरक्षणाचा कालावधी हा शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते 8 सप्टेंबर 2023 सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहील.