Chandra Grahan 2021 Sutak Dos and Don'ts: अन्न न शिजवणं ते चंद्र मंत्र पठण पहा आजच्या चंद्र ग्रहणामध्ये काय कराल काय टाळाल?
Chandra Grahan 2021 Sutak Time (Photo Credits: File Image)

आज कार्तिक पौर्णिमे (Kartik Purnima) दिवशी यंदाच्या वर्षातलं शेवटचं ग्रहण दिसणार आहे. या चंद्रग्रहणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चंद्रग्रहणाचा (Chandra Grahan) कालावधी देखील या शतकातील सर्वात मोठा कालावधी आहे. हे ग्रहण अंदाजे 3 तास 28 मिनिटांचं आहे. चंद्रग्रहण ही नैसर्गिक अवकाशीय घटना असली तरीही हिंदू धर्मीय या ग्रहणाबाबत खूप धार्मिक असतात. काही जण ग्रहणा संबंधी काही विधी, प्रथा परंपरा आजही पाळतात. त्यापैकीच एक म्हणजे सुतक काळ. ग्रहण सुरू होण्यापूर्वीच्या काही विशिष्ट काळाला सुतक काळ (Sutak Kal) म्हणतात. सुतक काळ ते ग्रहण संपे पर्यंतचा काळ अनेकांसाठी महत्त्वाचा असतो. आरोग्याच्या दृष्टीने तसेच शुभ कार्याच्या दृष्टीने देखील या ग्रहणाच्या काळात काही गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. मग जाणून घ्या नेमक्या कोणत्या गोष्टी ग्रहण काळात टाळाल?

सुतक काळ कोणता?

सुतक काळ हा चंद्र ग्रहण किंवा सूर्य ग्रहण या दोन्हींसाठी लागू असतो. सूर्यग्रहण लागण्यापूर्वी 12 तास आधी सुतक काळ सुरू होतो. तर चंद्र ग्रहणामध्ये हा कालावधी 9 तास आधीचा असतो. नक्की वाचा: Chandra Grahan 2021: यंदाच्या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण 19 नोव्हेंबरला; पहा सर्वात मोठ्या कालावधी साठी होणार्‍या या ग्रहणाचा वेळ काय? कुठे पहाल?

चंद्र ग्रहण सुतक काळात काय कराल काय टाळाल?

1. सुतककाळात अन्न शिजवू नये अशी रीत आहे. दरम्यान अन्न शिजवले असल्यास त्यावर तुळशीचं पानं ठेवावं.

2.सुतक काळात शक्य असल्यास कमी बोलावं. मौन व्रत पाळा किंवा ध्यान करा.

3.चंद्र ग्रहणाच्या वेळेस चंद्र मंत्र म्हणत रहाणं फायद्याचं असल्याचं सांगितलं जातं.

4. मातीचे दिवे लावा.

5. सुतक काळ संपल्यानंतर घर स्वच्छ करून आंघोळ करा.

6. सुतक काळ संपल्यानंतर देव घर आण घर गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून पवित्र केले जाते.

7. काहींच्या मते ग्रहण काळात गरोदर स्त्रियांनी घराबाहेर पडू नये. ग्रहणाचा बाळाच्या वाढीवर विपरित परिणाम होऊ शकतो.

8. सुतक काळात केस विंचरणे, दात घासणं देखील टाळावं.

9. देवांच्या मूर्त्यांना देखील ग्रहण काळात स्पर्श करणं अशुभ मानलं जातं.

10. नकारात्मक विचार किंवा राग देखील टाळा.

जेव्हा पृथ्वी सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होते. आज 19 नोव्हेंबर दिवशी होणारे चंद्रग्रहण महाराष्ट्रातून दिसणार नाही. भारतात देखील ईशान्य पूर्व भागात काही राज्यांमध्ये काही प्रमाणात चंद्रग्रहण दिसणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी ग्रहणाशी निगडीत वेध न पाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून लेटेस्टली मराठी यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवणं, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.