कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे यंदा अनेक सण आणि उत्सवांवर मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत गेल्या दोन महिन्यातील सण अतिशय साधेपणाने साजरे झाले व आता वेध लागले आहे ते आषाढी एकादशीचे (Ashadhi Ekadashi Wari 2020). समोरचा धोका लक्षात घेता सरकारने यंदाची आषाढी वारी मोजक्याच लोकांचा उपस्थितीमध्ये पार पडेल असेल असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्या, 12 जून रोजी संत तुकाराम महाराज यांची पालखी (Sant Tukaram Palkhi 2020) देहूगाव येथून पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहे. त्यानंतर 13 जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dyaneshwar Palkhi 2020) प्रस्थान सोहळा पार पडेल.
तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान सोहळ्यास उद्या दुपारी साधारण 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, गावात गर्दी होऊ नये म्हणून आज रात्री पासून गावात लोकांना येण्यास बंदी असणार आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी 335 व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठीची जवळ जवळ सर्व तयारी आता पूर्ण झाली आहे. मंदीर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीस परवानगी आहे व त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व निर्देशांचे पालन करावे लागेल. श्री संत तुकाराम महाराज मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरणही करण्यात आले आहे. गावात कडक पोलीस बंदोबस ठेवण्यात आला आहे.
असा असेल कार्यक्रम –
शुक्रवारी पहाटे चार वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिरात काकड आरती व अभिषेक पार पडेल.
साडेचारला श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा होईल.
पाच वाजता वैंकुठगमण मंदिरातील महापूजा होईल.
सकाळी सहाला पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची पुजा होईल.
नऊ वाजता श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका भजनी मंडपात आणल्या जातील. दहा वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी आजोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होईल. यावेळी काल्याचे किर्तन होईल.
त्यांतर महाराजांच्या पादुका श्री विठ्ठल रुख्मिणी यांची भेट घालून, कीर्तन मंडपात आणल्या जातील.
अखेर दुपारी दोनला प्रस्थान सोहळ्याला सुरवात होईल.
दरम्यान, यावर्षी संत ज्ञानेश्वर माउलींचा वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. माऊलींच्या चलपादुका मोजकेच वारकरी, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीच्या दिवशी पंढरपुरला जातील. आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच शनिवारी होत आहे. तसेच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, वारकरी मंडळीनी आळंदी येथे न जाता घरातून थेट प्रेक्षपणाद्वारे, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घ्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी केले आहे.