Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2022: कोरोना संकटानंतर यंदा 2 वर्षांनी  संत ज्ञानेश्वर पालखी पायी वारीसाठी 21 जूनला प्रस्थान ठेवणार; इथे पहा वेळापत्रक
आषाढी एकादशी वारी | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रात कोरोना संकट (COVID 19 Pandemic) आटोक्यात आल्याचं चित्र असताना पुन्हा सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. गुढी पाडव्याच्या शोभायात्रेनंतर आता महाराष्ट्राला आस लागली आहे ती पंढरपूरच्या वारीची (Pandharpur Wari). यंदा 2 वर्षांनंतर पुन्हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा पायी सोहळा पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dyaneshwar Palkhi) आषाढी यात्रेत (Ashadhi Yatra) 21 जून दिवशी आळंदीतून पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान ठेवणार आहे.

पंढरपूरच्या संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पार पडली. यामध्ये 21 जूनला माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. लोणंदमध्ये अडीच दिवस, तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्काम करणार आहे. यंदा 2 वर्षांनी पुन्हा वारकरी मंडळी पायी आषाढी वारीत सहभागी होऊ शकणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी ठरणार आहे.हे देखील नक्की वाचा: Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration: पंढरपूर पालखी मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारकऱ्यांना अवाहन .

कसा असेल संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी आषाढी वारीचा कार्यक्रम

माऊलींची पालखी 21 जूनला संध्याकाळी 4 वाजता प्रस्थान ठेवेल. नंतर 22,23 जून पुण्यात, 24,25 जून सासावड, 26 जून जेजुरी, 27 जून वाल्हे, 28,29 जून लोणंद, 30 जून तरडगांव, 1,2 जुलै फलटण, 3 जुलै बरड, 4 जुलै नातेपुते, 5 जुलै माळशिरस, 6 जुलै वेळापूर, 7 जुलै भंडीशेगाव, 8 जुलै वाखरी आणि 9 जुलै दिवशी पंढरपूरला पोहचणार आहे.

मागील दोन वर्ष कोरोना नियमावलीचं पालन करत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका बसने पंढरपूरला रवाना केल्या जात होत्या. मोजक्या वारकर्‍यांना या पादुकांसोबत प्रवासाची संधी देण्यात आली होती पण यंदा पुन्हा पूर्वीप्रमाणे आनंदसोहळा साजरा करता येणार आहे.