International Coffee Day 2018 : जाणून घ्या काय आहेत कॉफी पिण्याचे फायदे
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

चहा सोबतच कॉफीदेखील आपल्या आयुष्याचा कधी एक महत्वाचा हिस्सा बनली समजलेच नाही. ‘a lot can happen over coffee’ असे म्हटले जाते. रात्रीच्या जागरणापासून ते प्रेमाच्या कबुलीपर्यंत जवळजवळ प्रत्येक प्रसंगाला कॉफीमुळेच चव येते. कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश आहे. कॉफीचे अनेक प्रकार रेस्टॉरंटमध्ये आढळतात. खास कॉफीसाठी प्रसिद्धअसणाऱ्या रेस्टॉरंटचीही संख्या बरीच आहे. एकट्या अमेरिकेमध्ये जवळजवळ 45% लोक कॉफीला प्राध्यान्य देताना दिसून येतात. म्हणूनच 1 ऑक्टोबरला जगभरात ‘जगातील कॉफी दिन’ साजरा केला जातो.

आधी कॉफी हे फक्त एक निमित्त म्हणून घेतले जायचे मात्र काळानरूप कॉफीचे अनेक फायदेही लोकांच्या ध्यानात येऊ लागले. आज स्वतःचे शरीर फिट राहावे म्हणून कॉफी पिणाऱ्यांच्या संख्येत विलक्षण वाढ झालेली दिसून येते. चला तर पाहूया नक्की काय आहेत कॉफी पिण्याचे फायदे

> कमी साखरेची कॉफी पिणे हृदयाला फायदेशीर असते. कार्डिओव्हस्क्युलर सेल्स खराब होऊ नयेत म्हणून कॉफीचे सेवन केले जाते. वयस्कर लोकांमध्ये हृदयाचे कार्य सुरळीत करण्यास कॉफी उपयुक्त ठरते असे जर्मनीमध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे.

> कॉफीमध्ये अँटीकँसर गुण असतात. ज्यामुळे कँसर होण्याची भीती कमी होते. यासोबतच हे लिव्हर कँसरपासून 40 टक्के वाचवते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

> डेन्मार्क येथे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार कॉफीच्या सेवनाने टाईप 2 डायबेटीस होण्याची शक्यता कमी असते. कॉफीमध्ये कॅफेनशिवाय असणारे घटक यामध्ये उपयुक्त ठरतात.

> कॉफी प्यायल्याने यकृताचा सिरोसिस होण्याची शक्यता कमी असते. रोज 1 कप कॉफी प्यायल्यास ही शक्यता 22 टक्क्यांनी कमी होते तर 2 कप कॉफी प्यायल्यास 43 टक्के कमी होते.

> जिममध्ये व्यायाम करण्याआधी कॉफी पिल्याचा फारच फायदा होतो. यामुळे तुम्हाला त्वरित उर्जा मिळते त्यामुळे न थकता तुम्ही व्यायाम करू शकता.