विजाग गॅस गळती (Photo Credit: ANI)

आज स्टायरिन (Styrene) गळती होत असलेल्या टँकरमधून पुन्हा गॅसचे धुके गळत असल्याची माहिती विशाखापट्टणम (Visakhapatnam) जिल्हा अग्निशमन अधिकारी संदीप आनंद यांनी दिली. एनडीआरएफच्या (NDRF) सहकार्याने अग्निशमन दलाचे सुमारे 50 कर्मचारी कार्यरत आहेत. खबरदारीसाठी आम्ही 2-3 किमीच्या अंतरावरील गावे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, 2 फोम टेंडरसह आणखी 10 फायर टेंडर घटनास्थळी उपस्थित आहेत आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. दरम्यान, गुरुवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील पॉलिमर उद्योगात विषारी वायूच्या गळतीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 1000 लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम झाला आहे. या घटनेनंतर डोळ्यांमध्ये जळजळ, श्वसनाला त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्याने त्यांना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. (Vizag Gas Leakage: गॅस गळतीमुळे 11 ठार, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदतीची केली घोषणा)

विषारी वायू गळतीमुळे दोन लहान मुलांसह अकरा जण मरण पावले आणि एक हजाराहून अधिक आजारी आहेत. कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळे 40 दिवसांपासून बंद असलेल्या प्लांटमधून विषारी स्टायरिन गॅस बाहेर पडला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी या अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले. "वायू गळतीमध्ये जीव गमावल्याच्या कुटूंबाला प्रत्येकी 1 कोटी रूपये देण्यात येणार आहेत, तर व्हेंटिलेटरवर असलेल्यांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल," 1984 च्या भोपाळ गॅस शोकांतिकेसारख्या धक्कादायक दृश्यांमध्ये, स्टिरिन गॅस गळतीमुळे आर.आर. वेंकटापुरम आणि चार गावे बाधित झाल्यामुळे डझनभर लोक जमिनीवर पडलेले दिसत होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना पहाटे 3.45 वाजताच्या सुमारास घडली. विशाखापट्टणम पोलिसांनी एलजी पॉलिमर्सविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे.

दुसरीकडे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी) आंध्र प्रदेश सरकार आणि केंद्राला या गॅस गळतीमुळे मृत्यू आणि लोकांचे होणारे नुकसान याबद्दल नोटीस बजावली आहे. आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांकडून उपचार आणि बचाव कार्याचा सविस्तर अहवाल मागविला आहे. यासह आंध्रच्या पोलिस महासंचालकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.