Vinesh Phogat on Protest: भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) ने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर मोठे वक्तव्य केले आहे. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनेश म्हणाली की, आमचा लढा सरकार किंवा सरकारच्या लोकांशी नाही, आमचा लढा फक्त एका व्यक्तीशी आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही.
विनेश फोगटने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'आम्ही आमची कुस्ती सोडून येथे आलो आहोत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आपलं पद सोडू शकत नाहीत का? हा देशाचा कुस्ती महासंघ आहे जो तुमच्या समोर बसला आहे आणि याशिवाय दुसरा कोणताही महासंघ नाही. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आम्ही बसणार आहोत. उद्या 10 वाजल्यापासून आम्ही धरणे धरणार आहोत. आम्ही क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची वाट पाहत आहोत.' (हेही वाचा -Delhi: दिल्ली महिला आयोग प्रमुख Swati Maliwal यांना कार चालकाने 15 मीटरपर्यंत ओढत नेलं: AIIMS समोर गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला अटक)
पुढे बोलताना विनेश फोगटने सांगितलं की, 'आमच्या जीवालाही धोका आहे. आम्ही पोलिस संरक्षणही घेतलेले नाही. अध्यक्षांच्या घराला कुलूप आहे. जेव्हा शोषण होते तेव्हा ते खोलीत होते आणि खोलीत कॅमेरा नसतो. ज्या मुलींचे शोषण झाले ते स्वतः याचा पुरावा आहेत.'
तथापी, सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, बैठकीत ठोस काहीही सांगितले गेले नाही, फक्त आश्वासने देण्यात आली. कारवाईबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही आश्वासनावर खूश नाही. आम्हाला कुस्ती महासंघ विसर्जित करायचा आहे. सर्व राज्यांचे महासंघ बरखास्त करावे. त्याची माणसे प्रत्येक राज्यात पसरलेली आहेत. केरळ आणि महाराष्ट्रातूनही फोटो येत आहेत. सरकारच्या आश्वासनावर आम्ही समाधानी नाही.' जोपर्यंत सरकार या प्रकरणी कोणतीही मोठी कारवाई करत नाही तोपर्यंत कुस्ती शौकिनांचे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विनेश आणि साक्षी यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षावर लैंगिक छळाचा आरोप -
कुस्तीपटू विनेश फोगटने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करण्याचा विचारही केला होता, असेही विनेशने सांगितले. या आरोपांनंतर अनेक पैलवान दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. या सर्वांनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
#Jantarmantar pic.twitter.com/Q9otWpXoLw
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) January 18, 2023
दरम्यान या आंदोलनात बजरंग पुनिया, विनेश फोगट, रवी दहिया, दीपक पुनिया, आशु मलिक, साक्षी मलिक, सतवर्त काद्यान, लास्ट पंघल, सुमित, सुरजित मान, सितांदर मोखारिया, संगीता फोगट, सरिता मोर, सोनम मलिक, महावीर फोगट, सत्य राणा आणि कुलदीप मलिक यांचा समावेश आहे.