Union Budget 2022: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात तरुणांसाठी 60 लाख नवीन नोकऱ्यांची घोषणा
Nirmala Sitharaman | (Photo Credits: ANI)

Union Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मध्यावर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सरकारने अर्थसंकल्पात तरुणांना दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 60 लाख नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. याशिवाय 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याचेही सीतारामन यांनी यावेळी सांगितले आहे.

निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख नोकऱ्या दिल्या जातील. मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्या देण्यात येतील. रोजगाराबाबत मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हे सरकार रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मात्र आता सरकारने 60 लाख नोकऱ्यांची घोषणा करून विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. (वाचा - Union Budget 2022-23 Highlights: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा!)

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे अमृत काळातील पुढील 25 वर्षांची ब्लू प्रिंट आहे. 2022-23 मध्ये राष्ट्रीय महामार्गाचा 25,000 किमी विस्तार केला जाईल. पुढील 3 वर्षांमध्ये, 400 नवीन पिढीच्या वंदे भारत गाड्या चांगल्या कार्यक्षमतेसह सादर केल्या जातील. 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल पुढील 3 वर्षांत विकसित केले जातील.

दरम्यान, अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, 'या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा भक्कम पाया मिळेल. पुढील आर्थिक वर्षात आर्थिक वाढ 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. चालू वर्षात भारताची आर्थिक वाढ 9.2% असण्याचा अंदाज आहे.