Amit Shah | | (Photo Credits: Facebook)

Amit Shah On Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना यांच्यातील विभाजनावरून अमित शहा (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी भाजपशी विश्वासघात केल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत एनडीएला बहुमत मिळाल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, यावर उद्धव ठाकरेंनी एकमत केल्याचंही अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून अमित शहा यांनी नांदेडमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा म्हणाले की, भाजपने गेल्या वर्षी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार पाडले नाही, परंतु उद्धव ठाकरेंच्या धोरणांना कंटाळलेले शिवसैनिक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार नाहीत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असणार हे जनतेने ठरवायचे आहे. (हेही वाचा -Amit Shah In Tamil Nadu: अमित शहा चेन्नईत पोहोचले, विमानतळावरील स्ट्रीट लाईट अचानक झाल्या बंद, भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त)

अमित शहा यांनी पुढे बोलताना सांगितलं की, भाजप अध्यक्ष या नात्याने मी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संभाषण झाले होते, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली की एनडीए जिंकल्यास फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. मात्र, निकालानंतर (2019 मध्ये) ठाकरे आश्वासन मोडून राष्ट्रवादीच्या गोटात जाऊन बसले. शिवसेना आणि भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या होत्या. पण शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून युती सोडली. उद्धव ठाकरेंनी फसवणूक आणि विश्वासघाताचे काम केले. मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नावाने निवडणूक लढवली गेली आणि मुख्यमंत्री होण्यासाठी ते काँग्रेसच्या कुशीत बसले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला धनुष्यबाणाचे निवडणूक चिन्ह परत मिळाले असून खरी शिवसेना कोण हे ठरले असल्याचे यावेळी अमित शहा यांनी सांगितले. तिहेरी तलाकची प्रथा बंद करणे, अयोध्येत राम मंदिर उभारणे, समान नागरी संहिता लागू करणे आणि मुस्लिमांना आरक्षण देण्यास ते सहमत आहेत का, यावर उद्धव ठाकरेंना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान देखील यावेळी शहा यांनी केले. हिंदुत्ववादी विचारवंत दिवंगत विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेवरूनही शाह यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.