आंध्र प्रदेश, ओडिसाच्या दिशेने झेपावले 'तितली' वादळ; अतिदक्षतेचा इशारा
(संग्रहित प्रतिमा) ( Photo Credit: ANI )

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हेवच्या दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या 'तितली' या चक्रीवादळाने बुधवारी रौद्र रुप धारण केले. हे वादळ प्रचंड वेगाने ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या दिशेने झेपावत आहे. सद्यास्थितीत हे वादळ प्रतितास १० किलोमीटर वेगाने वाहात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वादळ वाहण्याची तीव्रता गुरुवारी सकाळपासून अधिक वाढेल. ही तीव्रता प्रतितास सुमारे १४५ किलोमीटर इतकी वेगवान असू शकते. 'तितली' वादळाचे गांभीर्य लक्षात घेऊन ओडिसा सरकारने बचाव आणि सुरक्षा यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेल्या हवेच्या पट्ट्यामुळे गेल्या २४ तासापासून चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळास 'तितली' असे नाव देण्यात आले आहे. ११ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत हे वादळ गोपाळपूर आणि कलिंगपत्तनम मार्गे ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या सागरी सीमेवर धडकण्याची शक्यता आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा धोका विचारात घेऊन वादळाचा प्रभाव पडू शकणाऱ्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, ओडिसाचे मुख्य सचिव आदित्य प्रसाद यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आंगणवाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत.

शक्यता वर्तवली जात आहे की, 'तितली' चक्रीवादळ गोपाळपूर आणि कलिंगपटनमवर गुरुवारी पोहोचेल. दरम्यानच्या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, वादळी वाऱ्याचा वेग प्रतितास १२५ किलोमीटर इतका असेल.