Farrukhabad: वराचा रंग काळा असल्याने लग्नमंडपात वधूने लग्न करण्यास दिला नकार, वाचा नेमकं प्रकरण काय ?
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook)

लग्नाच्या मांडवात ऐन वेळी लग्न मोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याआधी अनेक कारणांवरून लग्न मोडल्याचे त्या घटनेतून समजले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये वधूने वराचा रंग काळा असल्याने भल्या मांडवात लग्न करण्यास नकार दिला आहे. या अशा ऐन वेळी दिलेल्या नकारामुळे वराकडील लोकांना आणि वराती मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) फरुखाबाद (Farrukhabad) जिल्ह्यात एका महिलेने वराच्या काळ्या रंगाचे कारण सांगून आपले लग्न रद्द केले.  महिलेच्या या निर्णयाने प्रकरण पोलिसांपर्यंत (UP Police) पोहोचलं. हे ऐकून पहिले पोलीसांनाही धक्का बसला. वधूच्या घरातील लोकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा लग्नासाठी नकारच होता. वधूची समजूत काढण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र ते अयशस्वी ठरले. परिणामी शेवटी वर, त्याचे कुटुंब आणि वरात रिकाम्या हाताने आपल्या मूळ घरी परतली.

कन्नौज (Kannauj) येथील गुरसैगंज (Gursahaiganj) भागात राहणारा वर लग्नासाठी सरपालपूर गावी आला होता. “जयमाल” लग्न सोहळा ठरला होता. त्यांची वधूदेखील आनंदाने हजर राहिली. परंतु नंतर वधू तिच्या खोलीत गेली. तसेच तिच्या घरातील आणि मित्रांना सांगितले की तिचे लग्न होणार नाही. तिने वराच्या काळ्या रंगाचे कारण देत तो तिच्या योग्यतेचा नसल्याचे सांगितले.

लग्न मोडल्याची बातमी वरापर्यंत पोहोचली. त्याला मोठ्या प्रमाणात याचा धक्का बसला. मात्र यातून सावरत त्याने याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाची सर्व माहिती त्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांकडून वधूची समजूत काढण्यात आली. पोलिसांनी तिला वराची घरी नांदायला जाण्याची विनंती केली. मात्र वधूने पोलिसांना देखील थेट नकार दिला. आपण काळ्या माणसाशी लग्न करणार नाही सांगितल्यावर आम्हीही काही काळ थक्क झालो, अशी माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अच्छे लाल पाल यांनी दिली.

दरम्यान याप्रकरणी वराच्या कुटूंबीयांनी पोलिसांची मदत घेतली. याची कुटूंबाकडे पोलिसांनी लेखी तक्रार मागितली. मात्र त्यांनी प्रकरणाची कोणतीही औपचारिक तक्रार केली नाही. यानंतर अनेक समजूतीचे प्रयत्न करून त्याचे कुटुंब आणि इतर पाहुणे अखेरीस पुन्हा घरी परतले. वधूच्या अशा हट्टामुळे हे लग्न होऊ शकले नाही.