Dog | Pixabay.com

Telangana Animal Cruelty Horror: संगारेड्डीच्या एडुमैलाराम गावात अज्ञात व्यक्तींनी ३२ कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून 40  फूट उंच पुलावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या या घटनेत 121 कुत्र्यांचा मृत्यू झाला असून 11 कुत्र्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 4जानेवारी रोजी सिटिझन फॉर अॅनिमल्सच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हे भयानक दृश्य उघडकीस आले. साचलेले पाणी आणि घाणीमध्ये कुजलेले मृतदेह आणि जखमी कुत्रे त्यांना आढळले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जिवंत कुत्रे कुजलेल्या मृतदेहांमध्ये आढळले, तर काही मृतदेहांमध्ये मॅगॉटची लागण झाली होती. डम्पिंग साइटची खोली आणि साचलेल्या पाण्याच्या उपस्थितीमुळे बचावकार्य विशेषतः आव्हानात्मक बनले. अॅनिमल वॉरियर्स कन्झर्वेशन सोसायटी आणि पीपल फॉर अॅनिमल्स हैदराबाद यांच्या मदतीने ११ जखमी कुत्र्यांना बाहेर काढून नागोळे येथील निवारा केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

प्राणी कल्याण संघटनांनी या भीषण घटनेचा निषेध करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या प्राण्यांच्या क्रूरतेच्या घटना वाढत असून, प्रशासनाने माणसांविरोधातील गुन्ह्यांप्रमाणेच गांभीर्याने त्याकडे लक्ष द्यायला हवे, असे मत पृथ्वी पनेरू या स्वयंसेवकाने व्यक्त केले. सुटका करण्यात आलेले कुत्रे अतिदक्षता विभागात आहेत, परंतु त्यांच्या जखमांच्या तीव्रतेमुळे ते परत बरे होतील का?यावर शंका व्यक्त केली जात आहे.

सिटिझन फॉर अॅनिमल्सने दिलेल्या तक्रारीवरून इंद्रकरण पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. कुत्र्यांना जाणीवपूर्वक पाय आणि तोंड बांधून पुलावरून फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मृत कुत्र्यांच्या शवविच्छेदन अहवालासह पुरावे गोळा करून आजूबाजूच्या रहिवाशांची चौकशी केली जात आहे. हे कृत्य पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा संशय असला तरी हेतू अद्याप अस्पष्ट आहे.