Shivraj Singh Chouhan (फोटो सौजन्य - फेसबुक)

Air India Apologized To Shivraj Singh Chouhan: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) एअर इंडियाच्या विमानाने भोपाळहून दिल्लीला जात होते. यावेळी, त्यांना तुटलेल्या सीटवर (Broken Seat) बसून प्रवास करावा लागला. यानंतर त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. एक्सवर पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाने (Air India) शिवराज सिंह चौहान यांची माफी मागितली आहे.

एअर इंडियाने मागितली केंद्रीय कृषीमंत्र्यांची माफी -

या सर्व प्रकारानंतर एअर इंडियाने माफी मागितली आणि लिहिले, 'प्रिय सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आम्ही या प्रकरणाची काळजीपूर्वक तपासणी करत आहोत, याची कृपया खात्री बाळगा. तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाल्यास आम्हाला आनंद होईल, कृपया संपर्क साधण्यासाठी सोयीस्कर वेळ DM करा.' (हेही वाचा -CM Shivraj Singh Chouhan On MP Election Results: शिवराज सिंह चौहान यांची मध्य प्रदेशातील भाजपाच्या विजयी घोडदौडीवर प्रतिक्रिया आली समोर; पहा कुणाला दिलं श्रेय! (Watch Video))

दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट करताना शिवराज सिंह चौहान यांनी लिहिले की, 'आज मला भोपाळहून दिल्लीला यावे लागले, पुसा येथे शेतकरी मेळ्याचे उद्घाटन करायचे होते. कुरुक्षेत्रात नैसर्गिक शेती अभियानाची बैठक घ्यावी लागली आणि चंदीगडमधील शेतकरी संघटनेच्या सन्माननीय प्रतिनिधींशी चर्चा करावी लागली. मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 वर तिकीट बुक केले आणि मला सीट क्रमांक 8C मिळाली. मी जाऊन सीटवर बसलो, सीट तुटलेली होती आणि आत खोलवर गेली होती. मला या सीटवर बसणे वेदनादायक होते.'

केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पुढे लिहिले की, 'जेव्हा मी एअरलाइन कर्मचाऱ्यांना विचारले की जर सीट खराब असेल तर मला का देण्यात आली? त्यांनी सांगितले की व्यवस्थापनाला आधीच कळवण्यात आले होते की, ही जागा चांगली नाही. परंतु, तरी या सीटचे तिकीट विकले गेले. माझ्या सहप्रवाशांनी मला माझी जागा बदलून चांगल्या जागेवर बसण्याची विनंती केली. पण मी माझ्यासाठी दुसऱ्या मित्राला का त्रास देऊ, मी ठरवले की मी याच जागेवर बसून माझा प्रवास पूर्ण करेन.'

तथापी, केंद्रीय मंत्र्यांनी लिहिले की, टाटा व्यवस्थापनाने एअर इंडियाची सेवा ताब्यात घेतल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, असे मला वाटत होतं, परंतु ते माझे गैरसमज असल्याचे निष्पन्न झाले. बसण्याच्या अस्वस्थतेबद्दल मला काळजी नाही, परंतु प्रवाशांना पूर्ण पैसे आकारल्यानंतर त्यांना वाईट आणि अस्वस्थ करणाऱ्या जागांवर बसवणे अनैतिक आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का? भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशी गैरसोय होऊ नये यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन पावले उचलेल का? की प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकर पोहोचण्याच्या मजबुरीचा फायदा घेत राहील? असा संतप्त सवाल कृषी मंत्र्यांनी केला आहे.