सिद्धारमैय्या, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कर्नाटक (Photo Credits: Facebook)

कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत सस्पेन्स कायम आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळून चार दिवस झाले असले तरी काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केलेले नाही. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार यांची नावे आघाडीवर आहेत. बुधवारी (ता. 17) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान अनेक अहवालांमध्ये म्हटले जात आहे की, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित केले आहे आणि उद्या ते शपथ घेऊ शकतात.

कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी मंगळवारी काँग्रेसमध्ये जोरदार मंथन सुरू होते. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दिवसभर बैठकांचा दौरा सुरू होता. खरगे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सुमारे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. मंगळवारी संध्याकाळी खरगे यांनी दोन्ही प्रमुख दावेदार सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यानंतर सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. परंतु अजूनतरी याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

दुसरीकडे, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) महिला शाखेच्या अध्यक्षा पुष्पा अमरनाथ यांनी बुधवारी दावा केला की, सिद्धरामय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झाले आहे. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पुष्पा म्हणाल्या की, मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित झाले आहे आणि योग्य वेळी याची अधिकृत घोषणा केली जाईल.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष केला. अनेक ठिकाणी त्यांचे समर्थक फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करत आहेत. मात्र, त्यांच्या नावाबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (हेही वाचा: Rahul Gandhi US Visit: राहुल गांधी 31 मे पासून अमेरिकेच्या दौऱ्यावर; न्यूयॉर्कमधील Madison Square येथे काढणार भव्य रॅली- Reports)

बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची कमानही त्यांच्याकडे राहणार आहे. मात्र, या ऑफरबाबत त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.