कॉंग्रेसचे नेते आणि माजी वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) 31 मे रोजी 10 दिवस अमेरिकेला (US) भेट देतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी 4 जून रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये तिथल्या सुमारे 5000 भारतीय लोकांसह रॅली काढतील. या व्यतिरिक्त ते वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया येथील स्टँडफोर्ड विद्यापीठामध्ये पॅनेल चर्चा आणि भाषणासाठीही जातील. गांधी आपल्या भेटीदरम्यान अमेरिकन राजकारणी आणि उद्योजकांनाही भेटतील.
दुसरीकडे पंतप्रधान मोदी 22 जून रोजी राजकीय भेटीसाठी अमेरिकेत जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवड्यात एका पत्रकार निवेदनात म्हटले आहे की, अमरिकेत पंतप्रधान मोदी यांचा पाहुणचार राष्ट्रपतींकडून केला जाईल. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसाठी रात्रीचे जेवण देखील आयोजित केले गेले आहे.
राहुल गांधी यांचा याआधीचा परदेश दौरा चर्चेत राहिला होता. आपल्या लंडन भेटीमध्ये केंब्रिज विद्यापीठात केंद्र सरकार आणि भारतीय लोकशाहीवर टीका केल्यामुळे राहुल गांधी चर्चेत आले होते. मार्च 2023 मध्ये ते लंडनमध्ये म्हणाले- ‘प्रत्येकाला माहित आहे की भारतीय लोकशाहीवर दबाव आणला जात आहे आणि त्याच्यावर हल्ला केला जात आहे.’ राहुल गांधी यांच्या विधानानंतर, सत्ताधारी भाजप नेत्यांनी त्यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली होती. (हेही वाचा: Nitin Gadkari Received Death Threat: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन कॉलवरुन मिळाली धमकी, दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु)
केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांच्या भाषणानंतर संसदेतही मोठा गदारोळ माजला होता. संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात, जेथे भाजप राहुल गांधींकडून माफी मागण्याची मागणी करत होते तिथे, कॉंग्रेसने अदानी गटाच्या कंपन्यांवर संशयित आर्थिक व्यवहाराचा आरोप करत संयुक्त सदस्य समिती (जेपीसी) स्थापनेची मागणी करण्यास सुरवात केली. आता राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर हा त्यांचा पहिलाच विदेश दौरा असेल.