'व्हॅलेंटाईन डे नव्हे, कामदेव दिवस साजरा करतोय म्हणा' काँग्रेस नेते शशी थरुर यांचा प्रेमिकांना सल्ला
Shashi Tharoor | (Photo Credits: Twitter)

Valentine's Day 2019: व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास विरोध करणाऱ्यांच्या विरोधात प्रेमिकांची बाजू घेत काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) मैदानात उतरलेत. थरुर यांनी व्हॅलेंटाईन डेनिमित्त सर्वांना शुभेच्छा (Happy Valentines Day 2019) दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना थरुर यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि हा दिवस (14 फेब्रुवारी) साजरा करण्यास विरोध करणाऱ्या मंडळींना चांगलाच चिमटा काढला आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करताना जर तुम्हाला कोणी धमकी दिली, मित्रमैत्रींसोबत बाहेर फिरण्यास मनाई केली. अथवा संघ परिवाराने (Sangh Parivar) तुम्हाला ट्रोल केले तर, त्यांना सरळ सांगा की आम्ही भारताचा पारंपरिक कामदेव दिवस (Kamadeva Divas) साजरा करत आहोत, असे थरुर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, शशी थरुर हे लव्ह गुरु आहेत. त्यामुळे ते व्हॅलेंटाईन डेला पाठिंबा देणारच. हा दिवस साजरा करण्यास जर कोणी विरोध केला तर, त्याविरोधात थरुर हे मैदानात उतरणारच, अशी काहीशी उपहासात्मक टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शशी थरुर यांच्या ट्विटवर केली आहे. व्हॅलेंटाईन डे हे विदेशी फॅड आहे. भारतीय संस्कृतीमध्ये व्हॅलेंटाईन डे कधीच नव्हता. परंतू, विदेशी संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्यांनी व्हॅलेंटाईन डे हे फॅड भारतात आणले, असे सांगत गेली अनेक वर्षे देशातील हिंदूत्ववादी आणि काही विशिष्ट विचारांची मंडळी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास विरोध करतात. (हेही वाचा, ट्विटरवर रंगतय Valentine’s Day Challenge, जगभरात सिंगल मुलींना यंदा मिळतेय डेट!)

दरम्यान, देशभरातील अनेक मंडळी व्हॅलेंटाईन डेला विरोध करत असली तरी, हा दिवस साजरा करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमी युगुलांसाठी आनंदाची पर्वणी असलेला दिवस असे काही लोक मानतात. लोकांकडून खास करुन तरुणाईकडून हा दिवस साजरा केले जाण्याचे प्रमाण पाहून बाजारपेटांनीही व्हॅलेंटाईनचे महत्त्व ओळखले आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्येही व्हॅलेंटाईन वीक आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यां मंडळींना डोळ्यासमोर ठेऊन खास वस्तू आयात केल्या जातात. ज्या भेटवस्तू आणि इतरही बरेच साहित्य असते.