SBI (Photo Credit - PTI)

SBI Core Banking System Stop: आज सकाळपासून तांत्रिक अडचणीमुळे भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प झाल्या आहेत. मात्र, एटीएम (ATM) आणि पीओएस मशीनवर कोणताही परिणाम झालेला नसून या सेवा सध्या सुरु आहेत. यासंदर्भात बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. 'ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे, ही विनंती. लवकरचं ऑनलाईन सेवा पूर्ववत केल्या जातील,' असंही बँकेने दिलगिरी व्यक्त करताना म्हटलं आहे.

एसबीआयने सांगितले आहे की, कनेक्टिव्हिटीच्या मुद्द्यांमुळे कोअर बँकिंग यंत्रणेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन बँकिंग सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, एटीएम आणि पीओएस मशीनवर कोणताही परिणाम झालेला नसून या सेवा सुरू आहेत. (हेही वाचा - Paytm बँकेत FD वर मिळेल 7% व्याज; IndusInd Bank सोबत भागीदारी करुन पेटीएमची युजर्ससाठी खास सुविधा)

यापूर्वी, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या योनो (YONO) अॅप वापरकर्त्यांना यासंदर्भात माहिती दिली होती की, 11 आणि 13 ऑक्टोबर 2020 रोजी योनोच्या सेवांवर परिणाम होईल.

एसबीआयने आज झालेल्या त्रुटीबद्दल ग्राहकांना ट्विटरवर माहिती दिली आहे. मात्र, यावर ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यात एका ग्राहकाने म्हटलं आहे की, “ट्विटरवर पोस्ट करण्याऐवजी ही महत्वाची नोटीस एसएमएसद्वारे सर्व ग्राहकांना पाठवायला हवी होती.” तर दुसर्‍या वापरकर्त्याने म्हटलं आहे की, "ऑनलाईन बँकिंग वेबसाइट वापरू शकत नाही. तसेच यूपीआयच्या कोणत्याही अ‍ॅप्सद्वारे पैसे भरणे शक्य नाही. कालपासून एसबीआयच्या ऑनलाईन सेवेसंदर्भात त्रास होत आहे. "