Reliance Industries Limited MD and Chairman Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या केवळ दोन दिवसानंतर, देशात आर्थिक मंदी असूनही मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीमध्ये 29,000 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. आरआयएल अध्यक्षांच्या बैठकीदरम्यान घेतल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे हे घडले असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीमध्ये पुढच्या महिन्यात जिओ फायबर (Jio Fibre) लॉन्च करणे आणि अरामकोला (Aramco) उभ्या असलेल्या तेलाच्या रसायनांमध्ये 20 टक्के हिस्सा विकण्याचा करार याबाबत निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयांमुळे गेल्या दोन दिवसांतच कंपनीच्या शेअरर्समध्ये 11 टक्क्यांचा वाढीव फायदा झाला आहे. यानुसार आतापर्यंत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 28 हजार 684 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सच्या अहवालानुसार अचानक संपत्ती वाढल्यामुळे मुकेश अंबानी आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या (World's Richest People) यादीत 13 व्या स्थानावर पोहचले आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती 49.9 अब्ज डॉलर्स इतकी आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबानी यांनी वर्षाकाठी (वायटीडी) 5.57 अब्ज डॉलर्सची कमाई केली. (हेही वाचा: मुकेश अंबानी यांचे रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल; मुंबईजवळ वसवणार सिंगापूरच्या धर्तीवर मेगासिटी)

एजीएम दरम्यान अंबानी यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणेमध्ये सौदी अरामकोबरोबर एफडीआय कराराची घोषणा करण्यात आले होती. त्याअंतर्गत कंपनीने मार्च 2021 पर्यंत स्वतःला पूर्णतः कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत रिलायन्स आता  क्लाउड सेवा सुरू करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. कंपनी देशभरात डेटा सेंटर सुरू करणार असून त्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी करारही केला आहे.