मुकेश अंबानी यांचे रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल; मुंबईजवळ वसवणार सिंगापूरच्या धर्तीवर मेगासिटी
Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवली. जिओमुळे अक्षरशः इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. आता मुकेश अंबानी रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. मुंबईजवळ एक मेगासिटी वसवण्याचे रिलायन्सचे नियोजन आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. सिंगापूरच्या धर्तीवर संपूर्ण शहर उभा करण्याचा रिलायन्सचा मानस आहे. या प्रकल्पाची ब्लु प्रिंट तयार केली असून, रिलायन्सचा हा एकमेव इतका मोठा प्रकल्प असणार आहे. कारण या प्रकल्पाचा प्रत्येक हिस्सा हा एक स्वतंत्र प्रकल्प असेल.

या शहरात जागतिक दर्जाच्या सर्व सोयी उपलब्ध असणार आहेत. सिंगापूरच्या धर्तीवर विमानतळ, पोर्ट, सागरी पूल अशी कनेक्टीव्हिटी असेल. हे शहर इतके मोठे असणार आहे की, यामध्ये तब्बल 5 लाख लोक राहू शकणार आहेत. तसेच व्यवसाय करण्यासाठी आणि कंपनी उभा करण्यासाठीही पुरेसी जागा असेल. येत्या 10 वर्षात या प्रकल्पावर तब्बल 75 अब्ज डॉलर्स खर्च केले जातील आणि तरीही या अत्याधुनिक शहरातील जागांचे दर मुंबईच्या तुलनेत खूपच कमी असणार आहेत.

मुंबईला पर्यायी शहर म्हणून ही मेगासिटी उभी राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील बरीचशी लोकसंख्या या मेगासिटीत स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईमधील गर्दी बरीचशी कमी होईल. या प्रकल्पामुळे रिअल इस्टेट क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे. रिलायन्स फक्त ही मेगासिटी उभीच नाही करणार तर या नव्या शहराचे व्यवस्थापनसुद्धा करणार आहे. त्यासाठी स्वतंत्र नियोजन यंत्रणा उभारली जाणार आहे. (हेही वाचा: मुकेश अंबानी यांच्या Jio GigaFibre चे होणार लॉन्चिंग; DTH-केबल TV मार्केटमध्ये रंगणार Price War; ग्राहकांना मिळणार फायदा)

नुकतेच मुकेश अंबानी यांनी जागतिक पातळीवर इकोनॉमिक हब विकसित करण्यासाठी नवी मुंबई सेझ कडून 4 हजार एकर जमीन लीज वर घेतली गेल्याची घोषणा केली होती. त्यासाठी प्राथमिक किंमत म्हणून 2100 कोटी रुपये दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. धीरूभाई अंबानी यांची मुंबईच्या जवळ जागतिक दर्जाचे नवे शहर वसविण्याची, आणि ते शहर दक्षिण मुंबईला जोडण्याची कल्पना होती. आता ही कल्पना सत्यात उतरणार आहे.