राजधानी एक्सप्रेसमध्ये दारू पिताना पकडले गेले रेल्वे अधिकारी; गुन्हा दाखल
Indian Railways | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

निवडणुकीच्या काळात रस्ते असो वा इतर कोणतीही वाहतुकीचे मार्ग, प्रत्येक ठिकाणी प्रशासनाची करडी नजर असते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे, आणि त्याचे काटेकोरपणे पालन होताना दिसत आहे. छापा टाकून कुठे पैसा तर कुठे दारू हस्तगत केली गेली आहे. अशात बातमी आहे की, राजधानी एक्स्प्रेस (Rajdhani Express) मध्ये दारू पिणाऱ्या सहा लोकांना अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे हा अपराध करणारे लोक रेल्वेचे अधिकारी आहेत, आणि त्यांना पकडणारेही रेल्वे अधिकारीच आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

शनिवारी मुंबई वरून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीच्या कोचमध्ये ही घटना घडली.  रेल्वे बोर्डच्या विजिलेंस टीमने कोच एचए-1 मध्ये छापेमारी करत सहा लोकांना दारू पिताना पकडले. चौकशीत आढळले की यापैकी एक अधिकारी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात सहाय्यक कमर्शियल मॅनेजर आहेत. आरोपींमध्ये एक पश्चिम रेल्वेचे विजिलेंस इंस्पेक्टर आणि दोन कमर्शियल इंस्पेक्टर यांचा समावेश आहे. (हेही वाचा: रेल्वे आणि विमानसेवा कंपनीकडून आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाकडून रेल्वे, उड्डाण मंत्रालयाला कारवाईचे आदेश)

रेल्वे मुंबईहून निघाल्यावर सुरत स्टेशनवर रेल्वे बोर्ड विजिलेंसचे चार अधिकारी रेल्वेत चढले. हे लोक ट्रेनच्या एचए -1 कोचमध्ये पोहचले असता, त्यांना पश्चिम रेल्वेचे कर्मचारी दारू पीत असलेले आढळून आले. त्यांच्याकडे तिकीट अथवा प्रवास परवानगी संबंधित कागदपत्रे मागितली असता, ते काहीच सादर करू शकले नाहीत. या चौघांनीही त्यांना वडोदरा येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर विजिलेंस टीमने त्यांना 5,750 रुपये दंड ठोठावला. लवकरच या आरोपाचा रिपोर्ट तयार करून तो पश्चिम रेल्वेकडे पाठवला जाणार आहे.