बोर्डिंग पासवर नरेंद्र मोदी यांचा फोटो (संग्रहित-संपादित प्रतिमा)

येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे, आणि त्याचे काटेकोरपणे पालन होताना दिसत आहे. नुकतेच बोर्डिंग पास, तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापल्याने निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डचे संचालक आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव यांना पत्र लिहिले आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीविषयी रेल्वे उदासीन असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे आता यावर योग्य कारवाई केली जावी असे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडियाच्या बोर्डिंग पास आणि रेल्वे तिकिटांवर छापण्यात आलेले नरेंद्र मोदी यांचे फोटो हा आचारसंहितेचा भंग आहे असे आयोगाचे म्हणणे आहे.

शुक्रवारी संध्याकाळी एयर इंडीयाच्या विमानाने मदुराई येथून उड्डाण केलेल्या एका प्रवाशाने एक फोटो ट्वीट केला होता. यामध्ये बोर्डिंग पासवर पंतप्रधान मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा फोटो होता. काही दिवसांपूर्वी एयर इंडियाला अशाच टीकेचा सामना करावा लागला होता, त्यावेळी असे बोर्डिंग पास रद्द केले गेले होते. त्यानंतर परत अशाप्रकारचे कृत्य घडले आहे. याबाबत आता निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. (हेही वाचा: लग्नपत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतं देण्याचे अपील करणे पडले महागात, निवडणुक आयोगाकडून परिवाराला नोटिस)

अजून एका प्रकरणात भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा भाग असलेल्या 'मैं भी चौकीदार' घोषणा लिहिलेला चहाचा कप रेल्वेत आढळून आला होता. एका प्रवाशाने हा फोटो ट्वीट केला होता. याबाबत रेल्वेला कारणे दाखवा नोटीस  बजावली होती. मात्र या नोटिशीला उत्तर देण्यात न आल्याने निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डचे संचालक आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे.