
Gujarat Medical College Ragging: गुजरातमधील भावनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात(Gujarat Medical College) रॅगिंगचा (Ragging) एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे सहा एमबीबीएस डॉक्टरांनी तीन इंटर्नचे अपहरण केले आणि त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. हे सर्व एका इंस्टाग्राम पोस्टवरील रागातून करण्यात आले. शनिवारी रात्री भावनगरमधील नीलमबाग पोलिस ठाण्यात या घटनेबाबत दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण, बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवणे, हल्ला करणे, धमकी देणे आणि अश्लील भाषा वापरणे यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कॉलेज प्रशासनाची कडक कारवाई
या घटनेनंतर, कॉलेजच्या अँटी-रॅगिंग समितीने तातडीने कारवाई करत सहापैकी चार आरोपींना तात्काळ निलंबित केले. कॉलेज प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सर्व आरोपी आणि पीडित इंटर्न हे सरकारी मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या सर टी हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपमधून जात होते. दोन आरोपींची इंटर्नशिप आधीच पूर्ण झाली होती. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विद्यार्थ्यांनी 'कॉन्व्होकेशन स्पीक्स' नावाचे एक इंस्टाग्राम पेज तयार केले होते. ज्यावर विनोदी मजकूर शेअर केला जात होता. पण या पेजवरील काही पोस्टमुळे आरोपीला राग आला आणि त्याने बदला घेण्याच्या उद्देशाने इंटर्नची रॅगींग केली.
पीडितांना 'कोंबडा' बनले
आरोपीने पीडिताला फोन करून भेटण्यास सांगितले. भेटायला आल्यावर त्याला जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आले. गाडी ज्वेल सर्कलकडे जाताच, एका आरोपीने गाडीतील दोन्ही इंटर्नना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर, त्याला एका हॉटेलसमोरील रस्त्यावर नेण्यात आले, जिथे उर्वरित आरोपी आधीच उपस्थित होते. तिथे, पीडितांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप करण्यात आला.
यानंतर, आरोपीने तक्रारदाराचा फोन घेतला. त्यांचे काही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिली. यानंतर, पीडितांना दुसऱ्या डॉक्टरच्या वसतिगृहाच्या खोलीत नेण्यात आले. जिथे त्यांना 'कोंबडा' बनण्यास भाग पाडले गेले.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेनंतर, पीडितांवर सर टी रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांनी कॉलेज डीनकडे तक्रार केली आणि नंतर पोलिसात गुन्हा दाखल केला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.