सासूबाईंनी माझे केस ओढले आणि मारहाण केली - ऐश्वर्या राय
File image of Tej Pratap Yadav with wife Aishwarya Rai | (Photo Credit: IANS)

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Former Bihar Chief Minister Rabri Devi) यांच्यावर त्यांची सून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी गंभीर आरोप केले आहेत. रविवारी राबडी देवी यांच्या निवासस्थानी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यांची सून ऐश्वर्या राय यांनी सासूबाईंनी माझे केस ओढले आणि मारहाण केली, असा गंभीर आरोप केला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या यांनी राबडी देवी तसेच सासरच्या अन्य व्यक्तीवर गंभीर आरोप केले होते.

राबडी देवी यांनी माझे केस ओढले. त्यानंतर मला मारहाण केली. तसेच आमच्या घरातील सुरक्षारक्षकांनी मला बळजबरीने घराबाहेर काढले, असे ऐश्वर्या राय यांनी सांगितले. ऐश्वर्या यांचे वडील आमदार चंद्रिका राय यांना या घटनेची माहिती समजल्यानंतर ते लागलीच घटनास्थळी दाखल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राबडी देवी यांच्याविरोधात सचिवालय पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच ऐश्वर्या राय यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयातही नेण्यात आले आहे. (हेही वाचा - लालू प्रसाद यांना विष देऊन मारण्याचा भाजप सरकारचा डाव; राबडी देवी यांचा आरोप)

दरम्यान, ऐश्वर्या यांनी पोलिस अधीक्षक गरिमा मलिक यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर सचिवालय पोलिस ठाण्यातील अधिकारी राबडी देवी यांच्या निवासस्थानी गेले. ऐश्वर्या यांनी राबडी देवी, मीसा भारती, तेज प्रताप आणि दोन सुरक्षारक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सचिवालय पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.