Edible Oils Prices: ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी, खाद्यतेलांच्या किंमतीत घट होण्यास सुरुवात
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये (Edible Oils Prices) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भारतात खाद्यतेलाच्या आयतीवर लावण्यात आलेले कर करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती माध्यमांत काही दिवसांपूर्वी झळकत होती. याचदरम्यान, भारतातील खाद्यतेलाच्या किंमतीत घट होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्याभरानंतर आता खाद्यतेलांच्या किंमती खाली येत आहेत. मुंबईतल्या किंमतींनुसार काही खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये सुमारे 20% घट झाली आहे. हे देखील वाचा- Wholesale Fuel Prices & Inflation: पेट्रोल-डिझेल घाऊक महागाई दरात मे महिन्यात 12.94% वाढ

ग्राहक व्यवहार विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार-

- पाम तेलाच्या किंमतीत 19 टक्क्यांनी घरसण झाली आहे. पाम तेलाची किंमत (7 मे 2021) 142 रुपये इतकी होती. आता ती 115 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाली आहे.

- सूर्यफूल तेलाची किंमत (5 मे 2021) 188 रुपये प्रतिकिलो होती. आता ती 157 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाली आहे, 16 % ची घसरण झाली आहे.

- सोया तेलाची किंमत (20 मे 2021) 162 रुपये प्रतिकिलो होती आता ती मुंबईत 138 रुपये प्रतिकिलो पर्यंत कमी झाली आहे. म्हणजे एकूण 15 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

- मोहरीच्या तेलाची किंमत (16 मे 2021) प्रति किलो 175 रुपये होती. आता या किंमतीत 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सध्या मोहरीचे तेल 157 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाली आहे.

- शेंगदाणा तेलाची किंमत (14 मे 2021) प्रति किलो 190 रुपये होती. तर, आता ती कमी होऊन 174 रुपये प्रतिकिलोवर झाली आहे. या तेलात 8 टक्क्यांनी घट झाली आहे.

- वनास्पती तेलाची किंमत (2 मे 2021) प्रति किलो 154 रुपये होती. आता ती 141 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाली आहे. वनास्पती तेलाच्या किंमतीत 8 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

हे लक्षात घ्यावे लागेल की, खाद्यतेलाच्या किंमती समन्वित घटकांवर अवलंबून असतात ज्यात आंतरराष्ट्रीय किंमती, देशांतर्गत उत्पादन यांचादेखील समावेश असतो.देशांतर्गत वापर आणि उत्पादन यांच्यातील दरी जास्त असल्याने भारताला खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत आहे.हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टीने सरकार मध्यम आणि दीर्घकालीन अनेक उपाययोजना करण्याच्या दिशेने कार्यरत आहे. या उपायोजमनांमुळे भारतात अन्न शिजवण्यासाठी मुख्य घटक असलेल्या खाद्यतेलाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.