प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचा भाजपमध्ये प्रवेश; एकेकाळी होत्या काँग्रेसच्या उमेदवार
bjp | (Archived and representative images)

प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय महासचिव (General secretary) कैलाश विजयवर्गिय (Kailash Vijayargiya) यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. मौसमी चटर्जी यांनी 2004 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पश्चिमि बंगालमधील कलकत्ता उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातून ( Calcutta North-East constituency) निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.  त्यानंतर त्या राजकीय विजनवासात होत्या. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी सक्रिय राजकाराणात पुनरागमन केले आहे.

मौसमी चटर्जी यांचा जन्म 26 एप्रिल 1948 मध्ये कोलकाता येथे झाला. मौसमी चटर्जी या चित्रपट इंडस्ट्रीमधील अशा निवडक अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांनी विवाह आणि अपत्यप्राप्तीनंतर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. आणि त्यात त्या बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाल्या. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी एका कन्यारत्नाला जन्म दिला. आई झाल्यानंतर त्यांनी बंगाली चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. बंगाली चित्रपटानंतर अल्पावधीतच त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि आपल्या खास अभिनयाने विशेष असा चाहता वर्गही निर्माण केला. (हेही वाचा, दोन पाद्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश)

प्रदीर्घ काळानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश करताना चटर्जी यांनी भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगाल हा डाव्या विचारांच्या पक्षांचा गढ मानला जातो. सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल पक्षाचे सरकार आहे. मात्र, गेली अनेक वर्षे भाजप इथे पक्षवाढीसाठी जोमाने प्रयत्न करतो आहे. चटर्जी यांच्या पक्षप्रवेशाने भाजपच्या या प्रत्नांना किती यश मिळते याबाबत उत्सुकता आहे.