Bihar Assembly Election 2020: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा बिहार विधानसभा निवडणुकीत वापर, BJP स्टिकर सोशल मीडियावर व्हायरल
BJP sticker on Sushant Singh Rajput | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Case) प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस यांच्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखेर या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय (CBI) या केंद्रीय संस्थेकडे सोपवला. सीबीआय त्यांच्या पद्धतीने जो तपार करायचा तो करत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष (BJP) मात्र सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा वापर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी करत असल्याचे पुढे आले आहे. भाजपने सुशांत सिंह यांची प्रतिमा वापरुन प्रचाराचे स्टीकरही छापल्याचे समजते. भाजपचे हे स्टीकर (BJP Sticker On Social Media) सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. अनेकांनी या स्टीकरवरुन भाजपवर टीकाही सुरु केली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण इतके चर्चिले जाण्यामागे बिहार विधानसभा निवडणूक हे प्रमूख कारण असल्याचे सांगितले जात होते. भाजपने छापलेल्या स्टीकरमुळे आता ते खरे ठरण्याची शक्यता दिसत आहे. सुशांत सिंह राजपूत यांची प्रतिमा असलेल्या भाजप स्टीकरवर 'ना भूले है, ना भूलने देंगे' असे वाक्य भाजप निवडणूक चिन्ह आणि बिहार भाजप या उल्लेखासह जस्टिस फॉर सुशांत असा हॅशटॅगही छापला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन सुरुवातीला अनेक आरोप झाले. वेगवेगळे मुद्दे समोर आले. बॉलिवूडमधील नेपोटीझम हा एक या प्रकरणातील प्रमुख मुद्दा होता. हळूहळू नेपोटीझम आणि इतर सर्व मुद्दे मागे पडत गेले आणि पुढे रिया चक्रवर्ती, बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन अशी विविध वळणं या प्रकरणाला मिळत गेली. त्यानुसार सीबीआय सोबतच ईडी, नार्कोटिक्स टेस्ट अशा विविध संस्था आणि गोष्टीही या प्रकरणात कार्यन्वयित झाल्या. हे प्रकरण आता पुढे आणखी कोणते वळण घेते हे येणारा काळच सांगणार असला तरी, सुशांत सिंह राजपूत याचा राजकारणासाठी वापर मात्र सुरु झाल्याचे दिसते. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'महागठबंधन' जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात, 'राजद' मोठ्या भावाच्या भूमिकेत, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर)

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याने 14 जूनला मुंबई येथील वाद्रे परिसरातील राहत्या घरी आत्महत्या केली. ही आत्महत्या की हत्या याबाबत सीपीआय तपास करत आहे. हा तपास सुरु असतानाच या प्रकरणात ड्रग्जची लिंक पुढे आली. आता या नव्या लिंक्सचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाने आता काही जणांना अटकही केली आहे. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरु असून हा तपास ठोस अशा निष्कर्षापर्यंत पोहोचू शकला नाही.