Sambhajiraje Chhatrapati On Morphed Pictures of Chhatrapati Shivaji Maharaj: आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकातून शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आल्याने विरोधी पक्षांनी भाजपवर अनेक टीका केल्या. या वादात अधिक भर घातली आहे व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने. तान्हाजी: द अनसंग वॉरिअर या चित्रपटाची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडिओमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवरायांच्या रुपात दाखवण्यात आले आहेत तर गृहमंत्री अमित शाह हे तानाजी मालुसरेंच्या रुपात दिसतात. असे मॉर्फ फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर निषेध व्यक्त करत राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
त्यांनी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये ते लिहितात, "पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी."
यावरच न थांबता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये सर्वांना आवाहन केले आहे की राजकारणाशी महाराजांचा संबंध जोडू नये. ते लिहितात, "आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये."
तर दुसरीकडे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांंचे शिवरायांच्या आणि तानाजी मालुसरेंच्या रुपातील फोटो व्हायरल झाल्यावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लबोल केला. ज्यांना असं वाटतं की छत्रपतींवर बोलण्याचा त्यांनाच अधिकार आहेत ते आता का गप्पा बसले आहेत? असं सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी केलेले ट्विट देखील त्यांनी रिट्विट केले आहे.