Ravindra Jadeja & his wife Rivaba Jadeja with PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने भाजप पक्ष (BJP) आणि नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या समर्थनार्थ खास ट्विट केले आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना बक्कळ पाठिंबा देणारे ट्विट जडेजाने केले आहे. यापूर्वी जडेजाची पत्नी रिवाबा हिने जामनगर येथून भाजप पक्षात प्रवेश केला होता. (क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रीवाबा जडेजाचा 'भाजपा'मध्ये प्रवेश)

रवींद्र जडेजा याचे ट्विट:

रवींद्र जडेजा याच्या या खास ट्विटला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जडेजाचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड कप 2019 च्या संघात स्थान मिळाल्याबद्दल मोदींनी त्याचे अभिनंदन देखील केले आहे.

नरेंद्र मोदी यांचे उत्तर:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र जडेजाचे हे ट्विट विशेष ठरत आहे. यामुळे पक्षाला फायदा तर होईलच. पण इतर पक्षांकडून रवींद्र जडेजावर टीका देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे रवींद्र जडेजा याच्या पत्नीने भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर महिन्याभरातच त्याचे वडील आणि बहिण यांनी काँग्रेसचा रस्ता धरला. जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग आणि बहिण नैनाबा यांनी जामनगर जिल्ह्यातील कडवाड शहरातून काँग्रेस नेता हार्दिक पटेल याच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

रविंद्र जडेजा गुजरात मधील जामनगरचा रहिवासी असून गुजरातमध्ये लोकसभेच्या एकूण 26 जागा आहेत. येथे तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान पार पडेल.