सचिन पायलट (Photo: IANS)

राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर कॉंग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. 44 वर्षीय कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया देताना, 'सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं' असं ट्वीट केले आहे. दरम्यान सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासोबतच राजस्थान पीसीसी चीफ या पदावरूनदेखील हटवण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच कॉंग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांच्यासह काही कॉंग्रेस आमदार भाजप च्या षडयंत्रात सहभागी झाले आहेत, त्यांनी राजस्थानच्या 8 कोटी जनतेने निवडलेल्या सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. हे अस्वीकार्य आहे त्यामुळे पायलट यांना पदावरुन काढुन टाकण्यात आले आहे. असे म्हटले आहे. आता कॉंग्रेसच्या राजस्थान राज्याच्या अध्यक्षपदी गोविंद सिंह यांची नियुक्ती झाली आहे.

सचिन पायलट ट्वीट

दरम्यान सचिन पायलट यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटच्या बायोमध्येदेखीलतात्काळ  बदल केला आहे. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या उल्लेखासोबत राजस्थान कॉंग्रेस अध्यक्षपदाचादेखील उल्लेख टाळला आहे.

ANi Tweet

सचिन पायलट यांनी राजस्थान मध्ये सरकाविरोधी बंडाचा पवित्रा घेतल्याने अशोक गेहलोत यांच्या सरकारला धोका निर्माण झाला होता. काल त्यांनी पक्षाचा व्हिप झुगारत आमदारांच्या बैठकीला देखील अनुपस्थिती लावली होती. 200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे 107, भाजपाचे 72आमदार आहेत. त्याशिवाय 13 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा अशोक गेहलोत यांचा दावा आहे.

दरम्यान मागील काही वर्षांपासून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये संघर्ष होता. आता हा शिगेला गेला आहे. सचिन पायलट हे कॉंग्रेसच्या तरूण नेत्यांच्या फळींपैकी एक तर राहुल गांधीच्या जवळचे समजले जात होते. मात्र काही महिन्यांपूर्वी जोतिरादित्य सिंधियांप्रमाणेच आता सचिन पायलट यांनी देखील आपली नाराजी व्यक्त करत सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला.