Rajasthan Assembly Elections Results 2018: काँग्रेसमुक्त भारत म्हणणारेच मुक्त होतील- अशोक गेहलोत
अशोक गेहलोत, काँग्रेस नेते | (Photo courtesy: Twitter)

Rajasthan Assembly Elections Results 2018: काँग्रेस 70 वर्षे जुना पक्ष आहे. काँग्रेसला मोठा अनुभव आहे. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजली नाही. ते काँग्रेस मुक्त भारतची घोषणा करत राहिले. पण, आता काँग्रेसमुक्त भारत म्हणणारेच मुक्त होतील असा टोला अशोक गेहलोत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजून दिसत आहे. तर सत्ताधारी भाजप पराभवाच्या छायेत आहे. अद्याप पूर्ण निकाल लागला नसला तरी, मतमोजणीदरम्यान कल हाती येत आहेत. विधानसभा निवडणूक निकाल कल काँग्रेसच्या बाजूने आहेत. त्यामुळे राजस्थानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमिवर अशोक गेहलोत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवलेल्या विश्वासबद्दल गेहलोत यांनी राजस्थानचे मतदार आणि जनतेचे आभार मानले. हा विजय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षातील नेते कार्यकर्ते यांच्या कष्टामुळेच मिळाल्याचे गेलहलोत म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी चांगले काम केले नाही. मोदी यांच्यासोबत अजित डोवाल यांच्यासारखे सल्लागार नसतील तर कदाचित ते चांगले काम करु शकले असते असेही गेहलोत म्हणाले. 2014मध्ये झालेला विजय हा भाजपचा नव्हता. तर, काँग्रेस पराभूत झाली होती. महत्त्वाचे म्हणजे 100 टक्क्यांपैकी भाजपला पूर्ण जनतेने मतदान दिले नव्हते. भलेही भाजप जिंकला होता पण, भाजपला केवळ 39 टक्केच मतदान मिळाले होते. उर्वरीत जनता त्यांच्या विरोधातच होती, याकडेही गेहलोत यांनी लक्ष वेधले. (हेही वाचा, राजस्थान - काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण? सचिन पायलट यांनी दिले उत्तर)

दरम्यान, राजस्थानमध्ये सत्ता मिळते आहे असे संकेत मिळू लागताच काँग्रेसच्या गोटात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार स्पर्धा पाहाला मिळत आहे. एका बाजूला अशोक गेलहोत तर, दुसऱ्या बाजूला सचिन पायलट या दोन प्रमुख नेत्यांची नावे सध्यातरी आघाडीवर आहे. मात्र, हे दोन्ही नेते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत थेट भाष्य करणे टाळताना दिसत आहेत. प्रसारमाध्यमांनी अशोक गेहलोत यांनाही राजस्थानच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रश्न विचारला. प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना गेहलोत म्हणाले, असे थेट सांगता येत नसते. त्यासाठी पक्षाचे हायकमांड, प्रमुख नेते आणि आमदार निर्णय घेत असतात. सर्वानुमते ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल तोच मुख्यमंत्री होईल असे गेहलोत म्हणाले.